BHOKARDAN

TYPE : FORTRESS

DISTRICT : JALNA

HEIGHT : 0

जालना जिल्ह्यातील भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण महाराष्ट्रातील जुने व ऐतिहासिक शहर म्हणुन ओळखले जाते. स्थानिक कथेनुसार याचे नाव भोगवर्धन राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन भोकरदन झाले असावे. खेळणा नदीकाठी सिल्लोड-जाफराबाद रस्त्यावर असलेले हे गाव सिल्लोडपासुन २० कि.मी. अंतरावर तर औरंगाबादपासून ६४ कि.मी. अंतरावर अजिंठा मार्गावर आहे. इ.स.१९८० पुर्वी प्रकाशित झालेल्या अनेक कागदपत्रात जुन्या शहराभोवती उध्वस्त तटबंदी असल्याचे उल्लेख येतात पण आता म्हणजे २०२३ साली या शहराची शोध भटकंती केली असता कोठेही कोटाचे अवशेष दिसुन येत नाही. जुन्या भोकरदन शहरात लाल गढी म्हणुन ओळखली जाणारी एक निजामकालीन गढी पहायला मिळते. मराठवाड्याचा हा भाग हैद्राबाद निजामाच्या ताब्यात असल्याने भारत स्वतंत्र होईपर्यंत या गढीचा वापर आसपासच्या गावामधील सारा जमा करण्यासाठी केला जात असे. सध्या या गढीत नंदकुमार देशपांडे यांचे वास्तव्य असुन हि गढी निजामकाळात त्यांच्या पूर्वजांनी लाड यांच्याकडून विकत घेतल्याचे ते सांगतात. लाडांची गढी म्हणुन हि लाड गढी कालांतराने अपभ्रंश होऊन लाल गढी बनली. गढीच्या दर्शनी भागात दरवाजाची नक्षीदार दगडी कमान असुन दोन टोकाला दोन षटकोनी बुरुज आहेत. ... या दोन्ही बुरुजाचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. यातील एक बुरुज अर्धवट ढासळलेला आहे. गढीचा आतील परिसर साधारण अर्धा एकर असुन आत एक दुमजली वाडा आहे. हि व्यापाऱ्याने आपली खाजगी वापरासाठी बांधलेली गढी असुन गढीला कोणत्याही प्रकारचा इतिहास नाही. गढी पहाण्यास १० मिनिटे पुरेसी होतात. भोकरदन हे ठिकाण उज्जैन ते पैठण या व्यापारी मार्गावर वसले होते. प्राचीन वाङ्‌मयात तसेच मार्कंडेय पुराणांत व अनेक शिलालेखात याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा म्हणजे प्रांताचा दर्जा प्राप्त झाला. भोगवर्धन येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील शिलालेखात आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख एका शिलालेखात येतो. इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास खेळणा नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे पण त्यानंतर मात्र या गावाचा इतिहास अज्ञात आहे. शां. भा. देव आणि र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली १९७३-७४ साली येथे उत्खनन करण्यात आले. त्यांत सातवाहनपुर्व, सातवाहन कालीन आणि सातवाहनोत्तरकालीन अनेक वस्त्यांचे अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. सातवाहन काळात हे शहर प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण शहरांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी शहरांशी जोडले गेले होते. सातवाहन सत्तेच्या अस्तानंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगीन काळात या शहराला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले. पेशवाईच्या काळात मराठवाडा निजामाच्या ताब्यात असल्याने भोकरदन हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!