BHIWAPUR
TYPE : GADHI
DISTRICT : NAGPUR
HEIGHT : 0
GRADE : EASY
नागपुर जिल्ह्यातील भिवापुर या तालुक्याच्या शहरात या शहराच्या नावाने ओळखला जाणारा भुईकोट आहे. नागपुर-उमरेड- भिवापुर हे अंतर ६८ कि.मी.असुन उमरेड भिवापुर हे अंतर २२ कि.मी.आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. भिवापुर शहराच्या अगदी टोकाला असलेला हा किल्ला साधारण एक एकर मध्ये पसरलेला असुन आज शेवटच्या घटका मोजत आहे. गावातील कुणालाही हे ठिकाण माहित नसुन किल्ल्यातील एका बुरुजावर असलेली कबर दर्गा म्हणुन परिचित आहे. गावात आल्यावर भिवापुर किल्ल्याची थोडी जास्तच चौकशी करावी लागते. गावाच्या एका टोकाला असलेल्या या किल्ल्याच्या थेट दरवाजापर्यंत गाडी जाते.किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला असुन तटबंदीची देखील मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. किल्ल्याच्या दरवाजासमोर एका चौथऱ्यावर झीज झालेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत.
...
किल्ल्याच्या दरवाजाच्या भागात असलेली तटबंदीची रचना पहाता या भागात रणमंडळाची रचना असल्याचे दिसुन येते. किल्ल्याच्या आतील भागात किल्लेदाराचे वंशज आजही वास्तव्यास असुन किल्ल्याचा मुख्य दरवाजा वगळता किल्ल्यात येण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याच्या सुस्थितीत असलेल्या एका बुरुजावर कबर असुन किल्ल्यात एवढीच एक वास्तू आज चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या इतर भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने या झाडीतुन वाट काढतच आपल्याला गडफेरी करावी लागते. या गडफेरीत आपल्याला एक बुजत चाललेली खोल विहिर पहायला मिळते. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण ५ बुरुज असुन तीन बुरुज वगळता इतर दोन बुरुज पुर्णपणे ढासळले आहेत. किल्ला पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. भिवापुर हे गाव मरू नदीकाठी वसलेल असुन गोंडराजा भिमशहा यांच्या नावावरून या गावाला भिवापुर हे नाव पडल्याचे सांगितले जाते. भिवापुरला गोंड राजांची सत्ता येण्यापुर्वी या प्रांतावर गवळी राजांची सत्ता होती. गोंड राजा छत्रशहाचा मुलगा भिमशहा याने भिवापुरच्या गवळी राजांचा पराभव करून भिवापुर येथे आपले बस्तान बसवले. या भिमशहाच्या काळात हा किल्ला बांधला असावा. बख्तबुलंद शहाच्या मृत्युनंतर भिवापुरची स्वतंत्र व्यवस्था भिमशहा व त्याचा पुत्र हिरशहा हे पहात होते. हिरशहा नंतर गोवींदशहाने स्वतंत्र कारभार पाहीला इ.स.१८६५ मध्ये हिरशहा व गोवींदशहाकडे भिवापुरची व्यवस्था पाहण्यासाठी ब्रिटीश सरकार तर्फे क्रिस्टन यांची नेमणूक करण्यात आली. पुढे दुसऱ्या रघुजींची मुलगी बनुबाई गुजर घराण्यात देताना भिवापुर व आसपासची गावे तिला लग्नात आंदण म्हणुन देण्यात आली व भिवापुरमध्ये गुजर घराण्याची मालगुजारी सुरू झाली. आजही भिवापुर येथील किल्ल्यात गोवींदशहाचे वंशज मसरामशहा राहतात.
© Suresh Nimbalkar