BHATALA

TYPE : ANCIENT SHIV TEMPLE/ BHAVANI TEMPLE

DISTRICT : CHANDRAPUR

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत. गोंड राजाचे राज्य स्थापित होण्याआधी अनेक वर्षाचा इतिहास या भागाला लाभला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्‍य, नागवंशीय यासारख्या अनेक राजसत्ता चंद्रपूरच्या भूमीवर नांदत होत्या. या राजांनी आपल्या शासनकाळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली. काळाच्या ओघात यातील अनेक वास्तू नष्ट झाल्या तर काही आजही आपला सुवर्ण इतिहास सांगत उभ्या आहेत. तर अशा या चंद्रपूर जिल्ह्यात शिल्पांचा खजिना असलेले एक गाव आहे. खर म्हणजे शिल्पांचा खजिना असल्याने या गावाचे नाव शिल्पग्राम असायला हवे पण या गावाचे नाव आहे भटाळा !!! चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात असलेले भटाळा हे गाव वरोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १२ कि.मी.अंतरावर तर वरोरा-चिमूर मार्गावर सालोरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. भटाळा गावात अनेक प्राचीन अवशेष असले तरी न चुकवण्यासारखी दोन ठिकाणे म्हणजे या गावातील महादेव मंदीर व भवानी मंदीर. ... यातील महादेव मंदिराला कळस, शिखर नसल्याने हे मंदिर "भोंडा महादेव' नावाने ओळखले जाते. कधीकाळी या प्राचीन मंदिराच्या कळसावर वीज कोसळली होती. या विजेमुळे मंदिराचा कळस आणि अमलकाला हानी पोहोचली. याचा जीर्णोद्धार करताना ते बांधकाम कळसाविनाच केले गेले. मंदिराच्या माथ्यावर कळस आणि अमलक नसल्याने मंदिराला "भोंडा महादेव' असे नाव पडले. भटाळा गावाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख असे हे विशालकाय शिवमंदिर आहे. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष असलेले वालुकाश्म दगडात बांधलेले हे मंदीर अभ्यासकांच्या मते ८-९ व्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या काळात बांधलेले आहे. पूर्व-पश्चिम ५ फुट आणि उत्तर दक्षिण ३५ फुट पसरलेले हे मंदिर गर्भगृह आणि अंतराळ अशा दोन भागात विभागलेले आहे. मंदिरात साधारण ५ फूट उंचीचे भव्य शिवलिंग असुन हे शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. २० x २० फुट आकाराच्या गर्भगृहात मध्यस्थानी चार स्तंभाच्या मध्ये ६ फुट व्यासाची काळ्या पाषाणाची पिंड असून त्यावर पाषाणातील ५ फुट उंचीचे शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवलिंगाचा वारीमार्ग थेट भिंतीला चिटकवलेला असुन त्यायोगे प्रदक्षिणेला अटकाव केला गेला आहे. मंदिराचा अंतराळ व गर्भगृहावर आणखी एक मजला बांधल्यामुळे त्याची उंची डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. या वरच्या मजल्यांचा पूजाविधीच्या दृष्टीने काहीही उपयोग नसल्यामुळे त्याची योजना ध्यानधारणा व स्थापत्याच्या दृष्टिकोनातूनच करण्यात आली असावी. गर्भगृहाच्या तलविन्यास पंचरथ असून गर्भगृहाच्या बाह्यांगावर असलेल्या देवकोष्ठांत दक्षिणेस कार्तिकेय, पश्चिमेस शिव व उत्तरेस चामुंडा यांच्या मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे गर्भगृहामध्ये चार चौरस स्तंभावर उभा असलेला मंडप. या मंडपावर प्रत्येक स्तरावरील चार तुळया एकमेकांना छेदतील अशा प्रकारचे छत आहे. स्तंभाच्या मध्यभागावर राष्ट्रकूटकालीन कलश व गवाक्षाची रूपके कोरलेली आहेत. मंदिराचे द्वारावर पाच कोरीव शाखा असून मध्ये स्तंभशाखा आहे. उत्तरांगावर पाच शिखरे नागर प्रकारची तर एक सोडून एक असलेली उरलेली दोन शिखरे द्राविड पद्धतीची आहेत. मंदिराचे शिखर अस्तित्वात नसल्याने अनेकांना हे शिखरविरहित चौकोनी मंदिर वाटते पण ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेले 'तेली का मंदिर' आणि भटाळयाचे शिवमंदिर यांत साध्यर्म आढळते. 'तेली का मंदिर' चे शिखर पाहिल्यास भटाळयाच्या शिवमंदिरास शिखर असताना ते कसे दिसत असेल याची कल्पना करता येते. हे संपुर्ण मंदीर अभ्यासण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. याशिवाय गावाबाहेर एक वाकाटक कालीन देवीमंदिर आहे. हे मंदीर भवानी मंदीर म्हणुन ओळखले जाते. भवानी मंदिर आजही चांगल्या अवस्थेत आहे. मंदीराचा मंडप मोठा असुन दोन्ही बाजुस कक्षासन आहे. मंदिराचे गर्भगृह खालील भागात अष्टकोनी असुन त्यावर गोलाकार कुंभाची रचना आहे. गर्भगृहात भवानी देवीचे नव्याने कोरलेले शिल्प असून मूळ शिल्प भग्न झाल्याने ते मंडपात ठेवलेले आहे. या शिवाय अजून एक गणेश शिल्प मंडपात ठेवलेले आहे. मंदीराच्या शिखरात एक दालन बांधलेले असुन त्यात शिवलिंग स्थापन केलेले आहे. मंदिराचे शिखर नागर शैलीचे असुन त्यावर आमलक व कळस आहे. गर्भगृह हे दक्षिणेत असून प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. मुख्यद्वार उत्तरेस व दुसरे पूर्वेस आहे. मंदीराच्या बाह्यांगावर जागोजागी अनेक देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते हे मंदिर ११-१२ शतकातील असुन ते वाकाटकांच्या काळात कोरले गेले असावे. हे संपुर्ण मंदीर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. भवानी मंदीर व महादेव मंदीर हि दोन्ही मंदीरे पहाण्यास अर्धा दिवस पुरेसा होतो. याशिवाय भटाळा गावात लेणी, उध्वस्त किल्ला, मंदीर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!