BHATALA
TYPE : GROUND FORT
DISTRICT : CHANDRAPUR
HEIGHT : 0
GRADE : EASY
चंद्रपूर जिल्ह्यात शिल्पांचा खजिना असलेले एक गाव आहे. खर म्हणजे शिल्पांचा खजिना असल्याने या गावाचे नाव शिल्पग्राम असायला हवे पण या गावाचे नाव आहे भटाळा !!!! आपला विषय जरी किल्ले असला तरी या गावाची भटकंती करताना जागोजागी इतके पुरातत्वीय अवशेष पहायला मिळाले कि ते पाहील्या शिवाय पुढे जाणे होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना आमचे विदर्भातील एक इतिहास संकलक मित्र श्री.गणेश बनसोड यांनी खेमजाई किंवा भटाळा या दोन्ही गावांपैकी एका गावात किल्ल्याचे अवशेष असल्याची माहिती पुरवली व आमची या दोन गावाची दुर्गमोहीम निश्चित झाली. नागपुरच्या भोसले दफ्तराच्या कागदपत्रात या दोन्ही गावांचा खेमजाईभटाळा असा एकत्रित उल्लेख असल्याने व आता हि दोन्ही गावे वेगवेगळी असल्याने नेमका कोणत्या गावात किल्ला आहे ते कळत नव्हते. आम्ही सर्वप्रथम खेमजई गावाची डोळस भटकंती केली. या भटकंतीत आम्हाला या गावात एक सुंदर अशी बारव, भोसले घराण्यातील कुणा वीराची समाधी व माळरानावर एका लहान तळ्याच्या काठी प्राचीन भग्न शिवमंदिराचे अवशेष पहायला मिळाले.
...
खेमजई गावाची भटकंती येथेच संपली पण कोठेच किल्ल्याचे अवशेष पहायला मिळाले नाहीत. पण गावातील एका दुकानदाराने आम्हाला डॉ.पल्लवी ताजने यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला व आमची दुर्गमोहीम एकदम सुलभ झाली. डॉ.पल्लवी ताजने यांनी आम्हाला केवळ भटाळा गावची माहीती पुरवली नाही तर किल्ल्याचे गुगल नकाशावरील स्थान देखील पाठवले. त्याबद्दल त्यांचे दुर्गभरारी समुहाकडून खुप खुप आभार व मनपुर्वक धन्यवाद. खेमजाई व भटाळा हि दोन्ही गावे एकमेकालगत असुन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आहेत. भटाळा हे गाव वरोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १२ कि.मी.अंतरावर आहे. भटाळा गावात अनेक प्राचीन अवशेष असले तरी न चुकवण्यासारखी दोन ठिकाणे म्हणजे या गावातील महादेव मंदीर व भवानी मंदीर. आपल्या संकेतस्थळावरील मंदीरे या विभागात या दोन्ही मंदीरांची माहीती दिली असल्याने ती माहीती येथे न देता मी आपल्या किल्ले या मुख्य विषयाकडे वळतो. भटाळा गावात प्रवेश केल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग हा महादेव मंदिराच्या मागून एक वाट भवानी मंदिराकडे जाते त्या वाटेने किल्ल्यावर जाता येईल. दुसरा मार्ग म्हणजे वाहन सोबत असल्यास भवानी मंदिरापर्यंत वहानाने जाता येते व तेथुन चालत किल्ल्यावर जाता येईल. भवानी मंदीर पाहुन झाल्यावर मंदिरासमोर आपल्याला एक तलाव पहायला मिळतो. स्थानिक लोक या तलावाला ऋषी तलाव म्हणुन ओळखतात. या तलावाच्या भिंतीवरून समोरील टेकडीवर जाण्यासाठी वाट आहे व या टेकडीवरच भटाळा किल्ला वा त्याचे अवशेष आहेत. ऋषी तलाव देखील प्राचीन असुन याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी तसेच एका बाजूने किल्ल्याचे संरक्षण यासाठी केला आहे. पावसाळ्यात तलावातील पाणी गढूळ होते त्यावेळी हे पाणी एका लहान हौदात आणुन तेथे गाळ बसवुन स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी त्याकाळी केलेली रचना आवर्जुन पाहण्यासारखी आहे. तलावाची भिंत पार करून टेकडी चढण्यास सुरवात केल्यावर काही अंतरापर्यंत बांधत नेलेल्या भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. यात एका ठिकाणी दरवाजाच्या ढासळलेल्या कमानीचे अवशेष देखील दिसतात पण हि तटबंदी किंवा किल्ल्याचा भाग आहे हे ठामपणे सांगता येत नाही कारण या अवशेषांमध्ये कोरीव काम केलेले दगड देखील आहेत. या वाटेने थोडे वार आल्यावर हि वाट उजवीकडे वळते व एका भग्न बुरुजाशेजारून किल्ल्यात प्रवेश करते. या भागात मोठ्या प्रमाणात गवत व झाडी वाढलेली असल्याने आपण भग्न दरवाजाने कि भग्न तटबंदी मधून किल्ल्यात प्रवेश करतो ते कळत नाही. टेकडीच्या खालील भागात असलेली भिंत जर किल्ल्याचा भाग मानली तर किल्ल्याचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. किल्ल्याचा वरील भागातील आकार चौकोनी असुन संपुर्ण किल्ला साधारण एक एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या चार टोकास चार बुरुज असुन आत व ढासळलेल्या तटावर मोठ्या प्रमाणात गवत व झाडी वाढलेली असल्याने किल्ल्याचे अवशेष ठळकपणे दिसत नाहीत. किल्ल्याच्या एका बुरुजावर नव्याने बांधलेला सिमेंटचा चौथरा असुन त्यावर हिरवी चादर अंथरलेली आहे. या कबरीवर आता येणे जाणे सुरु झालेले असुन त्यांनी किल्ल्यात फळझाडे लावली आहेत. मंदिरांच्या या गावात किल्ल्याशी काहीही संबंधित तेथे नव्याने एक दर्गा वसवला जातोय. यावर वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे. किल्ल्यावर गवतामुळे व ढासळल्याने बहुतांशी अवशेष गाडले गेले आहेत. त्यात नव्याने झाडे लावताना जमीन उकरली गेली आहे त्यामुळे उरलेसुरले अवशेष देखील नष्ट झालेले आहेत. किल्ल्यात येणारी वाट एका तटबंदीतुन आत शिरते तर दुसऱ्या तटबंदीतुन बाहेर पडते. या शिवाय अजून एका ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. त्यामुळे किल्ल्याला नेमके दरवाजे किती व कोणत्या ठिकाणी हे ठामपणे सांगता येत नाही. या शिवाय किल्ल्यावर पाण्याची सोय दिसून येत नाही किंवा ती बुजली गेली असावी असे वाटते. भवानी मंदिरापासून किल्ल्यावर येण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात तर किल्ला पाहण्यासाठी देखील तितकाच वेळ पुरेसा होतो. खेमजाई गावात बारव जवळ असलेली भोसले यांची समाधी छत्री कदाचित या किल्ल्याशी संबधित असावी असे वाटते. किल्ल्याचा इतिहास ज्ञात होत नसला तरी किल्ल्याच्या आसपासचा परीसर पहाता हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असावा असे वाटते. भटाळा गावात आल्यावर या किल्ल्याला आवर्जुन भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar