BHANSHIVARA

TYPE : FORTRESS

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

आपल्या ताब्यातील प्रदेशाच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारी वास्तू म्हणजे गढी. गढी म्हणजे सपाट भूमीवरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. वंशपरंपरेनी मर्यादित प्रशासकीय अधिकार प्राप्त झालेल्या काही परिवारांच्या गढय़ा म्हणजे प्राचीन संरंजामी व्यवस्थेचे केंद्र होते. या गढीतुन मुलकी-महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाणाऱ्या मंडळींत इनामदार जहागीरदार, देशमुख, पाटील यांच्या नावानेच ती गढी ओळखली जायची. काही गढीना किल्ल्याप्रमाणे अनेक शतकांचा इतिहास आहे पण त्यामानाने आपण गढीच्या संवर्धनासाठी फारसे जागरूक नाही. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात भानसहिवरा गावात आपल्याला अशीच एक सुंदर गढी पहायला मिळते. भानसहिवरा हे गाव अहमदनगर शहरापासून ५५ कि.मी.अंतरावर असुन नेवासा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी.अंतरावर आहे. भानसहिवरा गावाबाहेर असलेली हि गढी प्रथमदर्शनी आपल्याला एखाद्या किल्ल्याप्रमाणेच वाटते. गढीचा बाहेरील भाग म्हणजे परकोट असुन त्याच्या आतील भागात गढी सामावली आहे. इतकेच नव्हे तर या गढीच्या दरवाजाची रचना किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे करण्यात आली असुन हा दरवाजा दोन बुरुज व तटबंदीच्या आडोशाने लपवुन या दरवाजा समोर रणमंडळाची रचना करण्यात आली आहे. ... गावाबाहेर पडल्यावर आपण गढीभोवती असलेल्या परकोटाच्या दरवाजासमोर पोहोचतो. परकोटाचा हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीवर दोन शरभ कोरलेले आहेत. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा पुर्णपणे घडीव दगडात बांधलेलं असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दोन्ही देवड्यांच्या वरील बाजुस असलेल्या दालनात उतरण्यासाठी तटावरून जिना आहे. आता या दरवाजाचे केवळ एकच लाकडी दार शिल्लक आहे. या दरवाजाने परकोटात शिरल्यावर समोरच गढीची तटबंदी तिच्या टोकावर दोन बलदंड बुरुज व मध्यभागी चौकोनी आकाराचा बुरुज नजरेस पडतो. पहिल्यांदा नजर जाताच आपल्याला या चौकोनी बुरुजात दरवाजा असावा असे वाटते पण गढीचा मुख्य दरवाजा पश्चिमेस असुन उत्तराभिमुख आहे. चौकोनी दरवाजाच्या डाव्या बाजुस संकटसमयी गढीबाहेर पडण्यासाठी चोर दरवाजा दिसुन येतो. परकोटातून संपुर्ण गढीला बाहेरील बाजूने फेरी मारता येते पण यात कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. परकोटाचा हा परीसर साधारण सहा एकर असुन त्यातील एक एकरवर आयताकृती आकाराची मुख्य गढी सामावली आहे. गढीच्या पश्चिम बाजुस आले असता गढीत जाण्याचा चिंचोळा मार्ग व त्याच्या तोंडावर असलेले दोन बुरुज नजरेस पडतात. वरील बाजु वगळता हा संपुर्ण मार्ग बंदीस्त असुन गढीचा दरवाजा या वाटेच्या टोकाशी तटबंदीच्या कोपऱ्यात आहे. वाटेच्या उजवीकडील लहान बुरुज षटकोनी आकाराचा असुन त्याच्या समोरील म्हणजे डावीकडील मोठ्या गोलाकार बुरुजात काहीशा उंचावर पहारेकऱ्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. ८५० गडकोट फिरताना अशी रचना मला आजवर कोठे दिसुन आली नाही. दरवाजा, बुरुज,तटबंदी याचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे पहारेकऱ्याची देवडी असुन त्यात गढीचा टोकदार खिळे असलेला लाकडी दरवाजा ठेवलेला आहे. येथुन दोन्ही बाजूने बंदीस्त असलेल्या पायऱ्यांनी आपण गढीच्या माथ्यावर पोहोचतो. येथे डावीकडे घडीव दगडात बांधलेले वाड्याचे केवळ प्रवेशद्वार शिल्लक असू आतील वाडा पुर्णपणे भुइसपात झाला आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच तटबंदीला लागुन धान्याची कोठारे असुन त्याचा वापर आता घरे म्हणुन रहाण्यासाठी केला जात आहे. तटावर जाण्यासाठी अनेक ठिकाणी पायऱ्या असुन तटावरून संपुर्ण गढीला फेरी मारता येते. गढीच्या उत्तर व दक्षिण तटबंदीच्या मध्यभागी असलेले चौकोनी आकाराचे बुरुज दुमजली असुन त्याचा उपयोग हवा खाण्याचे ठिकाण (हवामहल) व दूरवर लक्ष ठेवणे यासाठी केला जात असावा. तटाला लागुन अनेक दालने बांधलेली असुन त्यांचा उपयोग रहाण्यासाठी तसेच साठवणीसाठी केला जात असावा. या दालनात आपल्याला दोन तळघरे तसेच शौचकुप पहायला मिळतात. दक्षिणपूर्व बुरुजावर आठ फुट लांबीची एक तोफ असुन उत्तरपूर्व बुरुजावर कवीजंग यांचे थडगे आहे. थडगे असलेल्या बुरुजाखाली एक कोठार असुन त्या शेजारी बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या बुरूजाजवळ घडीव दगडात बांधलेली ३०फुट खोल विहीर असुन तिच्या पाण्याचा आजही वापर केला जातो. वाडा नष्ट झाला असला तरी इतर वास्तूंनी परीपुर्ण अशी हि गढी असुन भरपूर अवशेष असल्याने संपुर्ण गढी फिरण्यास एक तास लागतो. गडकोटांप्रमाणे या गढय़ा देखील इतिहासाचे साक्षीदार असून त्याचे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. इ.स. १७५९ मध्ये मोघलांतर्फे हैद्राबादचा निजाम मोघलांच्या दक्षिण सुभ्याचा कारभार पहात होता. यावेळी कवीजंग बहादूर याची अहमदनगर किल्ल्याचा किल्लेदार म्हणुन नेमणुक होती. त्यावेळी सदाशिव भाऊ पेशवे यांनी सरदार कवीजंग बहादूर याला भानसहिवरा येथे वैयक्तिक जहागिरी बहाल करून मुत्सुद्देगिरीनं अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला. या कामात कान्हुरचे नारो बाबाजी नगरकर यांची मोठी मदत झाली. कवीजंग बहादूर याने भानासहिवरा गावाची स्थापना केली व येथे एक मोठी गढी बांधली. कवीजंग बहादूर याचा या गढीतच मृत्यु झाल्याने गढीतील एका बुरुजावर त्याचे थडगे उभारण्यात आले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!