BHANDARA

TYPE : GROUND FORT

DISTRICT : BHANDARA

HEIGHT : 0 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रातील काही किल्ले ब्रिटीश काळापासूनच सरकारी कामासाठी वापरले गेल्याने आजही सुस्थितीत आहेत पण त्यांना पाहणे मात्र आपल्या आवाक्याबाहेरील आहे. यातील काही महत्वाचे किल्ले म्हणजे अलिबागचा हिराकोट, अहमदनगर किल्ला,सीताबर्डी ,पुरंदर, ठाणे हे किल्ले होत. यातील सैन्यदलाच्या ताब्यात असलेले किल्ले ठराविक दिवशी काही अटीवर आपल्याला निदान पहायला तरी मिळतात पण ज्या किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले आहे अशा किल्ल्यांची भटकंती मात्र दुरापास्त आहे. हिराकोट, ठाणे किल्ला याप्रमाणे तुरुंगात रुपांतर करण्यात आलेला अजून एक किल्ला म्हणजे भंडारा किल्ला. ब्रिटीश काळापासूनच कारागृहात रुपांतर झालेला हा किल्ला दर्शनासाठी आपल्या सारख्या दुर्गप्रेमींच्या आवाक्याबाहेर असला तरी काही प्रमाणात या किल्ल्याचे दूरदर्शन आपल्याला करता येते. भंडारा शहराच्या मध्यभागी असलेला हा किल्ला साधारण सहा एकरवर पसरलेला असुन किल्ल्याला चहूबाजूंनी खंदकाने वेढलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये लहानमोठ्या आकाराचे सहा बुरुज असुन किल्ल्याच्या आत असलेल्या मूळ वास्तु फार पुर्वीच आतील कोठड्या बांधताना जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ... या वास्तुमधील केवळ एक विहीर आजमितीला शिल्लक आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पश्चिम बाजुस असुन उत्तराभिमुख आहे. दोन बुरुजात बांधलेल्या या कमानीदार दरवाजावर दोन शरभशिल्पे व कमळे कोरलेली असुन दरवाजाच्या वरील भागात तसेच बुरुज व तटबंदीवर चर्या पहायला मिळतात. या संपुर्ण बांधकामात जागोजागी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याचा दर्शनी दिसत असलेला तट घडीव दगडात बांधलेला असुन त्यावर नंतरच्या काळात चुन्याचा अथवा सिमेंटचा गिलावा करण्यात आला आहे. किल्ल्याभोवती असलेला रुंद खंदक केवळ खोदीव नसुन बांधकामाने चांगला मजबूत केला असुन त्यात आजही काही प्रमाणात पाणी जमा झालेले दिसते. खंदकाच्या आतील बाजुस असलेल्या तटबंदीतुन या खंदकात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. कारागृहा जवळ असलेल्या अधिकाऱ्याच्या परवानगीने आपल्याला किल्ल्याचा दर्शनी भाग म्हणजे केवळ मुख्य दरवाजा पहायला मिळतो. किल्ल्याच्या चहुबाजुला खंदक असल्याने व खंदकाच्या बाहेरील बाजुस वस्ती असल्याने किल्ल्याच्या तटबंदीला फेरी मारता येत नाही. किल्ल्याचा मुख्य दरवाजा, त्याशेजारील दोन बुरुज व खंदकाचा थोडाफार भाग पाहुन आपले दुर्गदर्शन पुर्ण होते. किल्ल्याचा दरवाजा पहाण्यास पाच मिनटे पुरेशी होतात. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळपास ३५ किल्ले आहेत. यांतील काही किल्ले गिरिदुर्ग तर काही किल्ले भुईकोट आहेत. इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यात देवगडच्या गोंड राजवटीचा उदय पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले. इ.स. १७३९ मध्ये नागपुरच्या रघुजी भोसल्यांनी वलीशहा या गोंड राज्याचा पराभव करून हा प्रदेश जिंकला. इ.स.१८१८ मध्ये सप्टेंबर महिन्यात मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून भंडारा शहर व किल्ला ताब्यात घेतला. त्यांनी या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृह म्हणुन केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!