BHALWANI
TYPE : FORTRESS
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
महाराष्ट्रात आज शिल्लक असलेल्या मोजक्या व किल्लेवजा सुंदर गढीमध्ये भाळवणी येथील गढीचा उल्लेख करता येईल. भाळवणी/ भालोनी अशा नावांनी ओळखले जाणारे हे गाव बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी.अंतरावर तर अहमदनगर येथुन ६८ कि.मी. अंतरावर आहे. भाळवणी हे ठिकाण दुर्गप्रेमी व भटक्यांना फारसे परीचीत नसले तरी येथील परीसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आजोळ म्हणुन चांगलेच प्रसिद्ध आहे. भाळवणी गावात असलेली निंबाळकर यांची हि गढी एखादा किल्ला वाटावा इतकी भक्कम व सरंक्षक बांधकामाने परिपुर्ण आहे. गावात प्रवेश करताना दुरूनच या गढीच्या तटबंदीत असलेला गोलाकार भक्कम बुरुज नजरेस पडतो. या बुरुज साधारण ४० फुट उंच असुन त्यावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. संपुर्ण गढीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन फांजीच्या वरील भागाचे बांधकाम हे विटांनी केलेले आहे. या बांधकामात जागोजागी लक्ष ठेवण्यासाठी तसेच मारा करण्यासाठी झरोके बांधलेले आहेत. गढीची रचना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय मजबूत असून गढीचा आतील भाग हा बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. संपुर्ण गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीचे मुख्य गढी व बाहेरील परकोट असे दोन भाग पडलेले आहेत.
...
मुख्य गढीच्या तटबंदीत लहानमोठे एकुण पाच बुरुज असुन बाहेरील परकोटाच्या तटबंदीत सद्यस्थितीत एकच बुरुज शिल्लक आहे. परकोटाची बहुतांशी तटबंदी आज ढासळली असली तरी त्यात असलेला मुख्य दरवाजा व त्या शेजारील बुरुज मात्र आजही सुस्थितीत आहेत. परकोटाच्या बाहेर दोन बाजूने वहात असलेले नदीचे पात्र पहाता कधीकाळी याचा वापर खंदक म्हणुन केल जात असावा. परकोटाचा पश्चिमाभिमुख असलेला दरवाजा, त्याशेजारील बुरुज व आजही शिल्लक असलेले इतर बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन माथ्यावरील बांधकाम हे विटांनी केलेले आहे. विटांच्या या बांधकामात सुंदर नक्षी कोरलेली असुन बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या तर तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकरी बसण्यासाठी देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस तटबंदीला लागून उंच चौथरा असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या चौथऱ्याहुन दरवाजाच्या वरील भागात तसेच तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. परकोटाच्या या आतील भागात कधीकाळी घोड्याच्या पागा व सैनिक राहण्याची सोय दिसुन येते. परकोटाच्या आत डाव्या बाजुस गोलाकार आकाराची भव्य बारव असुन या बारवेत उतरण्यासाठी बंदीस्त पायऱ्या व दरवाजा आहे. गढीच्या आतील बाजुने तसेच बाहेरील बाजूने या बारव मधील पाणी काढण्याची सोय केलेली आहे. परकोटाच्या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच गढीची तटबंदी व त्यातील बुरुज नजरेस पडतात पण गढीचा प्रवेश मात्र सहजपणे नजरेस पडत नाही. गढीत प्रवेश करण्याचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन आकाराने लहान आहे. या दरवाजाला लागून बाहेरील बाजुस असलेला चौथरा पुर्वी येथे एखादी बास्तु असल्याचे दर्शवितो. या दरवाजाच्या आतील भाग पुर्णपणे बंदीस्त असुन आत शिरल्यावर डाव्या बाजुस ओटे असुन उजवीकडे काही अंतरावर गढीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथे डाव्या बाजुस असलेले ओटे म्हणजे पुर्वी निंबाळकरांची कचेरी येथे होती. उजव्या बाजुस असलेले गढीचे प्रवेशद्वार चांगलेच मोठे असुन त्यातील लाकडी दरवाजा आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या वरील भागात विटांचे बांधकाम असुन त्यात तीन खिडक्या आहेत. या दरवाजाच्या आतील भागात दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर पुढील भागात कोरीवकाम केलेली दगडी कमान असुन तेथे गढीचा तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर अरुंद असा कमानीवजा बंदीस्त मार्ग पार करून आपण गढीच्या आतील भागात पोहोचतो. गढीच्या आतील भागात निंबाळकरांच्या वंशजांची नव्याने बांधलेली तसेच काही पडीक घरे आहेत. यातील पडीक घरांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढली असल्याने फिरता येत नाही. गढीच्या आतील भागात पाण्याची सोय करण्याकरिता विटांनी अष्टकोनी आकाराची ५० फुट खोल विहीर बांधलेली आहे. येथे आल्यावर आपली गढीची भटकंती पुर्ण होते. संपुर्ण गढी फिरण्याकरिता एक तास पुरेसा होतो. याशिवाय गावच्या दगडी पारावर एका झाडाखाली मोठी गणेशमुर्ती पहायला मिळते. भाळवणी येथील गढीच्या भेटीत मला भावलेले व्यक्तिमत्व म्हणजे अरुणराव निंबाळकर. निंबाळकर घराण्याचा परीसस्पर्श लाभलेले हे व्यक्तिमत्व आपल्या नावाभोवती राजे-सरकार अशी बिरुदे न लावता माणुसकीने अतिशय श्रीमंत आहेत. विलासराव देशमुख यांचे नात्याने मेहुणे असलेले अरुणराव निंबाळकर यांनी कोणत्याही प्रकारचा बडेजाव न दाखवता केलेला आमचा पाहुणचार हा कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहील. हा केवळ आमचाच अनुभव नसुन अनेकांनी हा अनुभव आपल्या गाठीशी बांधला आहे. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुधोजी निंबाळकर यांचें जेष्ठ पुत्र राजे जगदेवराव यांचें वंशज व छञपती शाहूंचे सेनापती राहिलेल्या हणमंतरावांचे घराणे निजामाकडे गेल्यानंतर त्यांना सुलतानराव हि पदवी मिळाली. बीड, खर्डा त्यांची जहागीरीची ठिकाणे असून खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणी व आसपासच्या ४२ गावची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकर यांना मिळाली. यानंतरचा इतिहास अगदी अलीकडील काळातील आहे. भाळवणी येथील भाऊसाहेब निंबाळकर व गुणाबाई निंबाळकर यांना नानासाहेब, साहेबराव, भैय्यासाहेब हे तीन मुलगे तर गजराबाई, कलावतीबाई व सुशीलाबाई या तीन मुली. यातील सुशीलाबाईंचा विवाह मौजे बाभळगाव ता.जि. लातूर येथील दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांच्या पोटी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. इतिहासाच्या पाउलखुणा सांभाळणाऱ्या या किल्लेवजा गढीला आवर्जुन भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar