BELHE

TYPE : FORTRESS

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

पर्यटन तालुका अशी जुन्नर तालुक्याची नव्याने ओळख होऊ घातली आहे. अष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री गणपती, शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी, हडसर,जीवधन, चावंड यासारखे बलदंड किल्ले तर नाणेघाट सारखा प्राचीन मार्ग तसेच परीसरातील डोंगरात कोरलेली असंख्य लेणी या भागात आहेत. मुंबई पुण्यापासुन जवळ असल्याने पर्यटकांची या भागात सतत वर्दळ असते. त्याला आता नव्याने कृषी पर्यटनाची जोड मिळाल्याने पर्यटनासाठी पोषक असे वातावरण या भागात तयार झाले आहे. या भागात पर्यटनासाठी जशी परीचीत ठिकाणे आहेत त्यापेक्षा जास्त अपरीचीत ठिकाणे आहे. असेच एक अपरिचित ठिकाण असलेल्या बेल्हे येथील गढीची आज आपण ओळख करून घेणार आहोत. पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेल्हे गाव वसलेले आहे. मुंबईहुन आळेफाटामार्गे बेल्हे गाव २०० कि.मी.अंतरावर असुन पुणे बेल्हे हे अंतर ९० कि.मी. आहे. जुन्नर ते बेल्हे हे अंतर ३८ कि.मी.आहे. आळेफाटा ते बेल्हे हे अंतर फक्त १२ कि.मी.आहे. हा भाग बागायती शेतीमुळे सधन असल्याने येथे बस तसेच खाजगी वाहनांची बऱ्यापैकी सोय आहे. बेल्हे गढी गावाच्या अंतर्गत भागात नदीकाठी असल्याने मुख्य रस्त्यावरून सहजपणे नजरेस पडत नाही. पण गावात नवाबाची गढी अशी चौकशी करता आपण सहजपणे गढीजवळ पोहोचतो. ... कधीकाळी संपुर्ण बेल्हे गाव हे तटबंदीच्या आत वसले होते याच्या खुणा सांगणारा नगरकोटाचा घडीव दगडात बांधलेला सुस्थितीतील दरवाजा आजही आपल्याला गढीच्या अलीकडे पहायला मिळतो. या दरवाजाच्या बाजुने रस्ता बांधताना शेजारील तटबंदी पुर्णपणे पाडण्यात आली आहे. दरवाजापासुन काही अंतरावर नदीकाठी साखर बारव नावाने ओळखली जाणारी एक पुष्करणी आहे. पश्चिम दिशेला असणारा नगरकोटाचा दुसरा दरवाजा मात्र काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाला आहे. बेल्हे गढी देखील नदीकाठी असुन तिची जुनी तटबंदी पडल्याने ती पुर्णपणे पाडुन त्या ठिकाणी सिमेंट व काँक्रीटची भिंत उभारली आहे. त्यामुळे या गढीचे मूळ सौंदर्य पुर्णपणे नष्ट झाले आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन मुख्य गढीच्या तटबंदीच्या चार टोकावर चार चौकोनी बुरुज बांधलेले आहेत. गढीच्या पुर्व व उत्तर बाजुस परकोटाची भिंत आहे. गढीचा मुख्य दरवाजा पुर्वेकडील तटबंदीत बांधलेला असुन त्या समोर परकोटाची आडवी भिंत असल्याने तो सहजपणे नजरेस पडत नाही. या दरवाजावर तसेच तटावर संरक्षणासाठी केलेले कोणतेही बांधकाम दिसुन येत नाही. गढीच्या मूळ बांधकामातील हा दरवाजा व त्याशेजारील तटबंदी इतकेच बांधकाम सध्या शिल्लक आहे. सध्या हा दरवाजा वापरास बंद केलेला असुन दक्षिणेकडील तटबंदीत असलेल्या लहान दरवाजाने गढीत प्रवेश करता येतो. गढीचा हा दरवाजा जुना असला तरी त्याचे नव्याने बांधकाम केलेले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर वळणदार मार्गाने आपण गढीच्या माथ्यावर पोहोचतो. गढीच्या या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडील तटबंदीत असलेल्या मुख्य दरवाजा समोरच एक कारंजे पहायला मिळते.या कारंजाचे देखील नुतनीकरण करण्यात आले आहे. गढीच्या मध्यभागी नवाबांचा वाडा असुन घडीव दगडी चौथऱ्यावर उभारलेला हा वाडा इंग्रजांच्या काळात म्हणजे इ.स.१९२४ साली बांधल्याने त्यावर पूर्णपणे ब्रिटीश बांधकामाची छाप दिसुन येते. वाड्याचे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. वाडा कुलुपबंद असल्याने आतुन पहाता येत नाही पण बाहेरील बाजूने त्याची प्रदक्षिणा करता येते. वाड्याच्या मागील बाजुस तीन वास्तु असुन पहिली वास्तु म्हणजे कधीकाळी घोड्याच्या पागा होत्या. आता या वास्तुचा उपयोग जनरेटर खोली तसेच गाडी ठेवण्यासाठी केला जातो. त्याशेजारी भिंतीत घुमट असलेली दुसरी चौकोनी आकाराची वास्तु म्हणजे नवाबाची खाजगी वापरातील मशीद आहे. या मशिदीच्या पुढील भागात चौकोनी आकाराची दगडी बांधकामातील खोल विहीर असुन या विहिरीवर पाणी खेचण्यासाठी ब्रिटीश काळातील हातपंप बसवलेला आहे. वाड्याच्या मागील बाजुस वरील मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना आहे. या जिन्याखाली बंद पडलेला ब्रिटीश काळातील जनरेटर पहायला मिळतो. येथे आपली वाड्याची प्रदक्षिणा पुर्ण होते. वाडा आतुन पहाता येत नाही व गढी पहाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे या गोष्टी लक्षात घेऊनच या गढीच्या भटकंतीचे नियोज करावे. या गढी पासुन काही अंतरावर आपल्याला पवार यांचा उध्वस्त वाडा पहायला मिळतो. गढीचा इतिहास पहाता या गढीचा मूळ पुरुष नवाब मकबूल उर्फ अजीजखान बहादुर हा चाकणचा किल्लेदार व फौजदार असल्याचे दिसुन येते. पेशवेकाळात नानासाहेब पेशवे यांनी अब्दुल अजीजखान याचा मुलगा मकसूद आलमखान शिवनेरीचा किल्लेदार असताना त्यास ४०००० रुपयांची जुन्नर परीसरात जहागिरी देऊन शिवनेरी किल्ला ताब्यात घेतला. यावेळी कसबे वेल्हे हे गाव नवाबाला जहागीर म्हणुन मिळाले व नवाब शिवनेरकर म्हणुन ओळखले जाणारे हे घराणे नवाब बेल्हेकर म्हणुन ओळखले जाऊ लागले. नानासाहेब पेशवे यांच्या रोजनिशीत (१७५३-५४) बेल्हे गाव मुजफ्फरजंग गाडदी यास जहागीर देऊन तेथे त्यास कुटुंब ठेवण्याची परवानगी दिल्याचे उल्लेख येतात. या नवाबास पुत्रसंतान नसल्याने त्याने आपल्या मुलीचा निकाह सुरतच्या नवाब आलम खानशी लावून दिला व या गढीची जहागिरी सुरतच्या नवाबाकडे गेली. गढीचा सांभाळ न झाल्याने काळाच्या ओघात गढीची तटबंदी ढासळत गेली. इ.स.२०१५ मध्ये या तटबंदीची सिमेंटच्या कोब्यात बांधणी करण्यात आली. मीर सुलतान आलम खान हे सध्याचे वंशज असुन गढीत जाण्यासाठी सुरतला फोन करून त्यांची परवानगी घ्यावी लागते. या नवाबाचे वय जवळपास ८० वर्षे असुन त्यांची मुले अमेरिकेत वास्तव्यास आहेत. या नवाबांची जुन्नर येथे देखील दुसरी गढी आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!