BARAMATI

TYPE : GADHI

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

बारामती शहर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शहाजीराजांच्या काळापासुन अस्तित्वात असलेल्या या गावात भुईकोट असल्याचे आजही गावातील लोकांना माहित नाही तर इतरांची गोष्टच सोडा. कऱ्हा नदीच्या काठावर असलेला हा भुईकोट आजही त्याच्या संपुर्ण तटबंदिसह सुस्थितीत असुन काळाच्या ओघात त्याची पडझड होण्यास सुरवात झाली आहे. या किल्ल्याची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या भुईकोटाची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. बारामती भुईकोटास भेट देण्यासाठी आपल्याला बारामती हे तालुक्याचे शहर गाठावे लागते. पुणे-बारामती हे अंतर १०५ कि.मी.आहे. बारामती शहर पोलीस ठाणे बारामती भुईकोटाच्या आत असल्याने पोलीस ठाणे विचारल्यावर आपण सहजपणे भुईकोटाच्या मुख्य दरवाजात पोहोचतो. किल्ल्याचे बांधकाम पहाता सध्या अस्तित्वात असलेल्या या भुईकोटाची बांधणी शिवकाळानंतर झाली असावी. ... साधारण आयताकृती आकार असलेला हा भुईकोट तीन एकर परीसरावर दक्षिणोत्तर पसरलेला असुन कोटाची लांबीरुंदी ५०० x ३०० फुट आहे. कोटाचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन कोटाच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीत एक लहान दिंडी दरवाजा आहे. मुख्य दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन एका बुरुजात पिराची मजार आहे. या बुरुजाच्या मागील बाजुने या दर्ग्यात व तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मुख्य दरवाजाच्या बाहेर असलेला एक बुरुज सोडुन दुसऱ्या बुरुजाशेजारी एक लहानसा चोरदरवाजा असुन त्यातुन आत जाण्यायेण्याचा भुयारी मार्ग आहे. या भुयारात पडझड झाल्याने हा मार्ग अर्धवट बंद झाला आहे. मुख्य दरवाजावर नगारखान्यासारखी वास्तु असुन येथे वावर नसल्याने मोठया प्रमाणात कचरा जमा झाला आहे. संपुर्ण भुईकोटाची तटबंदी घडीव दगडांनी बांधलेली असुन तटावरील काही भाग व चर्या विटांनी बांधलेल्या आहेत. कोटाची बाहेरील तटबंदी आजही सुस्थितीत असली तरी आतील बाजूस फांजीवर काही ठिकाणी बांधकाम केल्याने, काही ठिकाणी झाडी वाढल्याने तर काही ठिकाणी तटबंदी ढासळली असल्याने फांजीवरून फिरता येत नाही. भुईकोटाच्या आत पोलीस ठाणे व सरकारी कार्यालये असल्याने आत फिरण्यावर तसेच छायाचित्र काढण्यावर काही मर्यादा येतात. कोटाच्या आतील बाजुने फेरी मारताना दोन ठिकाणी तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या दिसुन येतात याशिवाय पुर्वेकडील तटबंदीशेजारी एक भलीमोठी विहीर दिसुन येते. वापरात नसल्याने या विहिरीचे पाणी खराब झाले आहे. कोटाच्या आत असलेल्या कार्यालयामुळे मुळ वास्तूत मोठया प्रमाणात बदल झाले असुन काही ठिकाणी तटापर्यंत जाता येत नाही. भुईकोटाबाहेरून संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते. या फेरीत आपल्याला कोटाचे एकुण १४ बुरुज पहायला मिळतात. यातील पश्चिमेकडील एका बुरुजात दगडी खिडकी पहायला मिळते याचा अर्थ या बुरुजात खोली असावी. गावामध्ये या कोटाची चौकशी केली असता काहीजण याचा उल्लेख नाईक यांची गढी असा करतात. इ.स.१६३७ मध्ये बारामती शहाजी राजांच्या अमलाखाली होती. केकावलीकार मोरोपंतांचे (१७२९-१७९४) बाबूजी नाईक यांच्या कऱ्हेच्या काठावर असलेल्या पराडकर वाड्यात बरीच वर्ष वास्तव्य होते. सद्यस्थितीत यापेक्षा जास्त माहिती मिळालेली नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!