BALLARSHA

TYPE : GROUND FORT

DISTRICT : CHANDRAPUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्गभटकंती करताना आपल्याला भद्रावती ,बल्लारशा, चंद्रपुर, माणिकगड यासारखे एकाहुन एक सरस किल्ले पहायला मिळतात. यातील बल्लारशा/बल्लारपूर हे आज येथे असलेला कागदकारखाना व कोळसाखाणी यामुळे महाराष्ट्रात औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जाते. कधीकाळी गोंड राज्याची राजधानी असलेला येथील बल्लारशा किल्ला मात्र काळाच्या ओघात आपली ओळख हरवुन बसला आहे. सह्याद्रीतील काही किल्ल्यांना लाभलेली प्रसिद्धी शहरात असुन देखील या किल्ल्याच्या वाटेला मात्र आलेली नाही. चला तर मग या दुर्लक्षित किल्ल्याची भटकंती करायला. चंद्रपुर जिल्हयातील हे तालुक्याचे ठिकाण चंद्रपूर पासुन १८ कि.मी. अंतरावर आहे. चंद्रपुर-गडचिरोली महामार्गावर असलेल्या या शहरात बल्लारशा रेल्वे स्थानकाजवळ वर्धा नदीच्या उत्तर तटावर हा किल्ला बांधलेला आहे. आयताकृती आकाराचा हा किल्ला ७ एकरवर पसरलेला असुन त्याच्या तटबंदीत गोलाकार आकाराचे १७ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडील तटबंदीत मुख्य दरवाजा तर पश्चिमेकडील तटबंदीत दुसरा लहान दरवाजा आहे. याशिवाय किल्ल्यातुन बाहेर पडण्यासाठी दक्षिण दिशेला वर्धा नदीच्या बाजुने तिसरा मोठा दरवाजा असुन आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी याच दिशेला चौथा दरवाजा आहे. ... किल्ल्याचा मुख्य दरवाजा दुहेरी परकोटाने बंदीस्त केलेला असुन या परकोटाला सहा बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला एकामागे एक असे काटकोनात बांधलेले तीन दरवाजे पार करावे लागतात. यातील पहिला दरवाजा उत्तराभिमुख असुन दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख तर तिसरा दरवाजा पुन्हा उत्तराभिमुख आहे. पहिला दरवाजा पुर्णपणे कोसळलेला असुन त्याच्या डावीकडील पहारेकऱ्याची देवडी व उजवीकडील बुरुज उद्ध्वस्त अवस्थेत शिल्लक आहे. परकोटाच्या या भागात तटाला लागुन वास्तुंचे चौथरे आहेत. या दरवाजाने आत आल्यावर उजवीकडे किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा आजही सुस्थितीत असुन याच्या दर्शनी भागात दोन बाजुना हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे गोंड राजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या शेजारी दोन कमलपुष्प कोरलेली दिसुन येतात. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस चौथऱ्यावर पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाचा आतील भाग म्हणजे बाहेरील भागाची प्रतिमाच आहे. परकोटाच्या या भागात देखील तटाला लागुन वास्तु चौथरे आहेत. दरवाजाने आत आल्यावर डावीकडे किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाची रचना देखील दुसऱ्या दरवाजा सारखीच आहे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस चौथऱ्यावर पहारेकऱ्यासाठी दुहेरी दालने असुन त्यातुन सैनिकांना किल्ल्यात जाण्यासाठी लहान दरवाजा आहेत. किल्ल्यातील हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. दरवाजा शेजारील बुरुजावर दगडी चर्या बांधलेल्या असुन त्यात तोफांचा तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या ठेवलेल्या आहेत. तिसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर आपला किल्ल्यात प्रवेश होतो. दरवाजाच्या आतील भागात तटबंदीला लागुन दरवाजावर तसेच तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत.किल्ल्याचा आतील परीसर म्हणजे मोकळे पटांगण असुन ते दोन भागात विभागलेले आहे. दरवाजाकडील परीसर काहीसा उंच असुन समोरील तटबंदीजवळचा परीसर खोलगट आहे. दरवाजा जवळील उंच भागात कोणतेही अवशेष नसुन शिल्लक असलेले अवशेष या खोलगट भागातच आहेत. या भागात जाण्यासाठी एका ठिकाणी काही पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली आल्यावर डाव्या बाजुस चौकोनी आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर पहायला मिळते. या विहीर शेजारी एक दगडी दालन बांधलेले असुन त्याच्या वरील भागात विहिरीचे पाणी खेचण्यासाठी मोट बांधलेली आहे. या उंचीवर पाणी घेऊन ते खापरी नळाने संपुर्ण किल्ल्यात फिरवण्याची सोय केलेली आहे. विहिरीच्या समोरील बाजुस दगडी कमानीत बांधलेली कोठारे असुन त्या शेजारी हमामखाना आहे. हमामखान्याच्या मागील बाजुस राजवाड्याचे अवशेष आहेत. या सर्व वास्तु अंतर्गत मार्गाने एकमेकाशी जोडलेल्या आहेत. हे संपुर्ण अवशेष आजही चांगल्या अवस्थेत असुन त्याचे वेळीच संवर्धन होणे गरजेचे आहे. येथुन सरळ जाणारा रस्ता आपल्याला तटबंदीजवळ घेऊन जातो. या तटबंदीत बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाबाहेर कोणतीही वाट दिसुन येत नाही. आणीबाणीच्या प्रसंगी या दरवाजात शिडी लावुन खाली वर्धा नदीपात्रात उतरून नौकेने पलीकडे जाण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असावा. दरवाजा शेजारी तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजा पाहुन उजवीकडे वळल्यावर तटबंदीमध्ये बांधलेली एक मोठी खाच दिसते पण याचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. या खाचेच्या उजवीकडे षटकोनी आकाराचा बुरुज असुन त्यात राणीमहाल अथवा हवामहल म्हणुन ओळखली जाणारी इमारत आहे. याची रचना आपल्याला देवगिरीच्या बारादरी या इमारतीची आठवण करून देतो. बुरुजातील या इमारतीला हवा येण्यासाठी अनेक गवाक्षे असुन आतील भागात अनेक नक्षीदार कोनाडे आहेत. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन वर बसण्यासाठी दगडी बाक बांधलेले आहेत. या बुरुजावरून दूरवर पसरलेल्या वर्धा नदीपात्राचा सुंदर देखावा दिसतो. या बुरुजाच्या पुढील भागात राजवाड्याचे अवशेष असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. येथे तटबंदीला लागुन भलामोठा अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार आहे. या अंबरखान्याला लागुनच किल्ल्याबाहेर जाण्यासाठी दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजातील पायऱ्यांनी खाली वर्धा नदी पात्रात उतरता येते. तटबंदीतील या दरवाजाबाहेर नदीच्या दिशेने अजुन एक दरवाजा बांधलेला आहे. या दरवाजा वरील कमान मात्र आज नष्ट झालेली आहे. या भागातील बांधकाम आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन येथील संपुर्ण तटबंदीला चर्या पहायला मिळतात. तटबंदीच्या कडेने तसेच पुढे आल्यावर एका बुरुजाच्या आधारे बांधलेला किल्ल्याचा चौथा लहान दरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा पाहुन झाल्यावर पुढील भागात कोणतेही अवशेष नसल्याने येथील पायऱ्यांनी तटावर चढावे. या भागातील किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असल्याने तटावरून फेरी मारत आपण किल्ल्यात प्रवेश केलेल्या दरवाजाच्या वरील भागात पोहोचतो. येथुन पुर्ण किल्ल्याची तटबंदी तसेच आतील भाग पुर्णपणे नजरेस पडतो. संपुर्ण किल्ल्याचे व आतील वास्तुंचे बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन त्यावर गोंड वास्तुकलेची छाप दिसुन येते. हा दरवाजा पाहुन प्रवेश केलेल्या दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. प्राचीन काळापासुन विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या व त्यांनी काळानुरूप किल्ल्यांची बांधणी केली. १३व्या शतकात विदर्भात गोंड राजवट उदयास आली व त्यांनी या भागावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप येथील किल्ल्यावर दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे त्यांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. भीम बल्लाळसिंग यांनी शिरपूर येथून बल्लारशा येथे गादी आणल्यावर पुढे खांडक्या बल्लारशा यांनी येथून चंद्रपूरच्या राज्याचा कारभार पाहिला. गोंड राजा खांडक्या बल्लारशा याने वर्धा नदीच्या काठावर एका शहराची व दुर्गाची निर्मीती करून त्यास स्वतःचे नाव दिले. गोंड राज्याच्या सुरवातीच्या काळात (इ.स.१४३७- ६२) बल्लारशा हे त्याच्या राजधानीचे ठिकाण होते. पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी चंद्रपूर येथे गादी स्थानांतरित करण्यासाठी झरपट नदीच्या काठावर नव्या किल्ल्याच्या परकोटाचा पाया रचला. पण हा किल्ला त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. पुढे त्यांचे पुत्र हिरशहा यांच्या काळात बांधकाम पूर्ण होऊन बल्लारशाची राजधानी चंद्रपूरला स्थानांतरीत झाली. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर असे त्यांच्या राजधानीचे स्थित्यंतर होत गेले. यानंतर १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. शेवटचा गोंड राजा निळकंठशहा याचा इ.स.१७५०मध्ये बल्लारपूर येथे कैदेत मृत्यु झाला. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात त्यांनी मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवलेच नाहीत. नगरधन, भद्रावती, रामटेक, नागपूर, पवनी, माहुरगड, अंबागड, भिवगड हे गोंडकालीन किल्ले आज विदर्भात पहायला मिळतात. इ.स.१७९० साली नानासाहेब भोसले यांनी किल्ल्याची काही प्रमाणात दुरुस्ती केली. इ.स.१८१८मध्ये अप्पासाहेब भोसले यांच्या काळात इंग्रज-मराठा युद्धात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्राचीन सुवर्ण काळ भोगलेला हा किल्ला आजही सुस्थितीत असला तरी येथील प्रदुषणामुळे धुळीच्या साम्राज्यात हरवत चालला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!