BAJAGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : GADCHIROLI

HEIGHT : 1647 FEET

GRADE : MEDIUM

नावातच गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक गड आहेत पण त्यातील सुरजागड,वैरागड, यासारखे एक दोन गड वगळता इतर गड जिल्ह्याच्या नकाशावरून जवळपास नाहीसे झाले आहेत. आजवर येथे पसरलेला नक्षलवाद व या दुर्गांचा आधार घेणारे नक्षलवादी हे जरी त्यामागचे कारण असले तरी सरकार दरबारी नसलेली या गडांची नोंद व सर्वच पातळीवर असलेली या गडांबद्दलची अनास्था याला कारणीभूत आहे. आजवर नक्षलग्रस्त प्रांत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या भागात भटक्यांची व अभ्यासकांची पाउले वळलीच नसल्याने हे दुर्ग स्वतःची ओळख हरवुन बसले आहेत. आमच्या गडचिरोली दुर्गभ्रमंतीमध्ये आम्ही या अपरिचीत दुर्गांचा मागोवा घेत त्यांचे नष्ट होत चाललेले अस्तित्व लोकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. शिवनेरी ट्रेकर्सच्या माध्यमातुन धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजवळील डोंगरावर बाजागड नावाचा किल्ला असल्याचे समजल्याने आम्ही या किल्ल्याचा आमच्या भटकंती यादीत समावेश केला होता. ... कुरखेडा येथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी प्रथम झापरागड,त्यानंतर टिपागड असे दोन दुर्गांचे दर्शन करून आम्ही बाजागड जवळच्या कुलभट्टी गावात पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजुन गेले होते. कुलभट्टी हे किल्ल्याजवळ असलेले गाव धानोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३३ कि.मी. अंतरावर तर गडचिरोली येथुन ७० कि.मी.अंतरावर आहे. भात कापणीत व्यस्त असलेल्या दोन स्थानिकांना विनंती करून आम्ही वाटाड्या म्हणुन सोबत घेतले व किल्ल्याच्या दिशेने कूच केले. किल्याचा पायथा गावापासुन साधारण २ कि.मी. अंतरावर असुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तलावाकडून किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर सहसा कोणी जात नसल्याने झाडीझुडुपातून वाट काढतच किल्ल्यावर जावे लागते त्यामुळे एक नव्हे तर दोन दोन वाटाडे सोबत असणे गरजेचे आहे. या जंगलात अस्वलांचा वावर असल्याने सावधगिरी बाळगूनच किल्ल्यावर जावे. तलावाकडून सुरवात केल्यावर आपण दाट जंगलात शिरतो व पंधरा मिनिटात डोंगराच्या खालच्या टप्प्यात कपारीत कोरलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचतो. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन ते वर्षभर उपलब्ध असते. येथून जंगलात वाट काढत साधारण पाउण तासाचा उभा चढ चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या खालील भागात पोहोचतो. गडावर व गडाच्या आसपास असलेले घनदाट जंगल हे या किल्ल्याचे बलस्थान किल्ल्याच्या खालील भागात दोन ठिकाणे वगळता कोठेही तटबंदी दिसुन येत नाही. जेथे दाट जंगल नाही त्या दोन ठिकाणी असलेली तटबंदी देखील पुर्णपणे ढासळलेली असुन बांधकामाचे हे दगड खालपर्यंत घरंगळत गेलेले आहेत. ढासळलेल्या या तटबंदीपासुन पुन्हा २० मिनिटांचा उभा चढ चढल्यावर आपण बालेकिल्ल्यात पोहोचतो. डोंगराचा हा माथा पुर्णपणे बंदीस्त करण्यासाठी त्यावर तटबंदीचे पागोटे चढवलेले आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाला असला तरी तटबंदी मात्र आजही तग धरून आहे. हि संपुर्ण तटबंदी केवळ रचीव दगडांची असुन तटाची उंची साधारण ८-१० फुट तर रुंदी ४-५ फुट आहे. बाजागड हा या भागातला सर्वात उंच डोंगर असुन त्याचा माथा समुद्रसपाटीपासुन १५९० फुट उंचावर आहे. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे या किल्ल्यावर असलेला एखाद्या धातुसारखा वाजणारा दगड. हा दगड ध्वज असलेल्या बुरुजावर आहे. या दगडावर दुसऱ्या दगडाने वाजवले असता पितळी घंटेप्रमाणे वेगवेगळे नाद निर्माण होतात. हा दगड गोंडी आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. बालेकिल्ला मोठ्या प्रमाणात झाडीने व्यापला असला तरी संपुर्ण तटाला फेरी मारता येते. माथ्यावरील अवशेष झाडीमुळे नष्ट झाले असावेत किंवा गाडले गेले असावेत. बालेकिल्ला पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. येथून पुन्हा पायथ्याशी जाण्यासाठी एका तास लागतो. संपुर्ण किल्ला पाहण्यासाठी किमान चार तासाचा अवधी हवा. गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या इतर अनेक वनदुर्गांप्रमाणे बाजागडचे किल्ला म्हणून कुठलेही संदर्भ वा माहिती उपलब्ध नाही. विदर्भातील हा किल्ला कोणाला परीचीत नसल्याने किल्ल्याचा इतिहास अबोल आहे पण गोंड राजसत्तेचा या भागावर असलेला प्रभाव पहाता हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा असे वाटते. गौंड राजांच्या अखत्यारीतील हा किल्ला आज आपली ओळख हरवुन बसला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!