AMRAVATI

TYPE : GROUND FORT

DISTRICT : AMRAVATI

HEIGHT : 0

GRADE : EASY

अमरावती जिल्ह्यात असलेल्या गाविलगड,आमनेर,अचलपुर या सारख्या दुर्गाना भेट देण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी अमरावती शहरात येतात पण अनेकांना आपण आलो ते अमरावती शहर देखील एक भुईकोट किल्ला आहे हे माहीत नसते आणि त्यामुळे या दुर्गाला भेट देण्याची राहुनच जाते. या अनोळखी दुर्गाची दुर्गप्रेमीना ओळख व्हावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. अमरावतीचे जुने शहर म्हणजे एक भुईकोट किल्ला नव्हे तर हे शहरच या कोटात वसलेले आहे. इ.स.१८५९ साली बांधलेले अमरावती स्थानक हे देखील त्या काळात शहराबाहेर होते. आज या परकोटा बाहेर शहर प्रचंड वाढलेले असून परकोटाचा बराचसा भाग दुकानांनी व उंच इमारतींनी झाकून गेला आहे.अमरावती शहराला असलेल्या या दगडी तटबंदीच घेर साडेतीन कि.मी. लांब असुन या तटबंदीत लहानमोठे व वेगवेगळ्या आकाराचे एकुण २१ बुरुज आहेत. तटबंदीची उंची १५ ते २० फुटापर्यंत कमीजास्त आहे. किल्ल्याच्या पुर्व भागातुन वहाणाऱ्या अंबा नदीचा खंदक म्हणुन वापर केला असल्याने या बाजुस तटबंदीची उंची कमी आहे. या तटबंदीत पाच मुख्य दरवाजे असुन चार लहान दरवाजे आहेत. हे लहान दरवाजे खिडक्या म्हणुन ओळखले जातात. या दरवाजांची नावे अनुक्रमे खोलापुरी गेट, महाजनपुरीगेट, अंबागेट, भुसारीगेट, नागपुरीगेट अशी असुन लहान दरवाजांची नावे माताखिडकी, खुनारीखिडकी, पटेलखिडकी व छत्रपुरी खिडकी आहेत. ... यातील दोन दरवाजांची नावे आता बदललेली असुन स्वतंत्र प्राप्तीनंतर भुसारीगेटला जवाहरगेट असे नाव देण्यात आले तर महाजनपुरी गेट छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा म्हणुन ओळखले जाते. हे सर्व दरवाजे रात्रीच्यावेळी बंद केले जात असत व सकाळी पुन्हा उघडले जात असत. निजाम काळात या सर्व दरवाजावर शिपाई तैनात असत व तिऱ्हाइताची चौकशी केल्याशिवाय त्याला आत घेतले जात नसे. तटबंदीतील दरवाजे बंद केल्यावर आतील रहिवाशांना आत घेण्याकरीता लहान दरवाजांचा वापर केला जात असे. यातील दोन लहान दरवाजे अतिक्रमणात लपलेले असुन माता खिडकी व मदीना खिडकी हे दोन लहान दरवाजे पहाता येतात. यातील मदीना खिडकी हे नाव नेमके कोणत्या उपदरवाजाचे आहे ते कळत नाही. काही ठराविक भाग वगळता तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक आहे. कोटाच्या उत्तर बाजुस म्हणजे जवाहर गेटच्या दिशेने असलेल्या तटबंदीचे जतन करण्यात आलेले आहे. या भागात विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. चला तर मग आपली कोटाची भटकंती खोलापुरी गेट पासुन सुरु करू या. दक्षिणाभिमुख असलेला हा दरवाजा दोन अर्धगोलाकार बुरुजांमध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या वरील भागात व तटावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. तटबंदीच्या आतील बाजुस तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजावर कोणतेही कोरीवकाम दिसुन येत नाही. खोलापुरी गेट शहराच्या दक्षिण दिशेस असुन या दरवाजापासून महाजनपुरी दरवाजापर्यंत अंबा नदीचे पात्र आहे. आता या नदीचे नाल्यात रुपांतर झालेले आहे. तटाच्या उजव्या बाजूने पुढील गडफेरीस सुरवात केल्यावर तटबंदीतील बुरुज, तटावर जाणाऱ्या पायऱ्या पहात दहा मिनीटात आपण महाजनपुरी (छत्रपती शिवाजी महाराज ) गेटजवळ पोहोचतो. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा थेट तटबंदीत बांधलेला असुन काही अंतरावर गोलाकार बुरुज आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस तटाला लागुन पायऱ्या असुन या दोन्ही पायऱ्याखाली पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. दरवाजाचे बांधकाम साधे दगडात असुन यातील टोकेरी खिळे असलेले लाकडी दार आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या माथ्यावर शिवरायांचा अर्धपुतळा स्थापन केलेला आहे. हा दरवाजा पाहुन पुढे जाताना अजुन एक उपदरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाबाहेर शंकराचे मंदिर असुन याला आता भोलेश्वर द्वार असे नाव देण्यात आले आहे. याचे मूळ नाव कळले नाही. हा दरवाजा पाहुन तटबंदीच्या कडेने तसेच पुढे आल्यावर आपण अंबा दरवाजात पोहोचतो. आपली खोलेश्वर दरवाजा ते अंबा दरवाजा हि गडफेरी कोटाच्या आतील बाजूने होते. अंबा दरवाजा दोन अष्टकोनी बुरुजात बांधलेला असुन याच्या दर्शनी भागात असलेल्या कमानीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजातील लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यावर मोठमोठे टोकेरी खिळे आहेत. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आत तटाला लागुन वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अंबा दरवाजाने कोटाबाहेर पडल्यावर तटबंदीच्या कडेने पुढे जाताना आपल्याला तटबंदीत असलेले विविध आकारचे बुरुज पहावयास मिळतात. यातील एक बुरुज पाकळीच्या आकाराचा तर एक षटकोनी आहे. हि संपुर्ण तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेली असुन फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. या मुख्य रस्त्याने तटाबाहेरून आपण भुसारी (जवाहर) दरवाजाजवळ पोहोचतो. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा दोन अर्धगोलाकार बुरुजामध्ये बांधलेला आहे. दरवाजाच्या दर्शनी कमानीवर कोरीवकाम केलेले असुन आतील लाकडी दार मात्र नष्ट झालेले आहे. या दोन्ही बुरुजाच्या आत खोल्या असुन त्याचे दरवाजे आतील तटबंदीत आहेत. हा दरवाजा पाहुन पुढे आल्यावर साधारण १० मिनिटाच्या अंतरावर नागपुरी दरवाजा आहे. हा भाग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असुन दरवाजा आतील रस्त्यापासुन आतील भागात आहे. विचारल्यावर सहजपणे आपण दरवाजात पोहोचतो. या भागातील तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक असुन ठिकठीकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. नागपुरी दरवाजा दोन बुरुजात बांधलेला या बुरुजाची उंची मात्र दरवाजापेक्षा कमी आहे. दरवाजा पश्चिमाभिमुख असुन याच्या दर्शनी कमानीवर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यावर मोठमोठे टोकदार खिळे आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. हा दरवाजा पाहुन आतुन अथवा बाहेरून तटबंदीच्या काठाने तसेच पुढे गेल्यावर पाच मिनीटात एका गल्लीत आपल्याला मदीना गेट (हे नवीन नाव आहे) हा उपदरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा तारखेडा भागात आहे. हा दरवाजा पाहुन तसेच पुढे गेल्यावर आपण सुवात केलेल्या ठिकाणी म्हणजे खोलापुरी दरवाजात पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. गडफेरी पायी अथवा वहानाने अशी दोन्ही प्रकारे करता येते. संपुर्ण गडफेरी पायी करण्यासाठी अडीच तास पुरेसे होतात. अमरावती शहराचा सर्वप्रथम उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारतात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर येथुन रुक्मिणीचे हरण केले होते. पुराण काळात हे शहर अंबानगरी म्हणुन ओळखले जात असे. त्यानंतर उदंब्रावती- उम्ब्रवती-उमरावती व पुढे अपभ्रंश होउन अमरावती नाव उदयास आले. अमरावतीचे नाव इथे असलेल्या प्राचीन अंबादेवी मंदीरामुळे पडले आहे. अमरावतीच्या प्राचीन अस्तित्वाचे उल्लेख जैनांचे भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या मुर्तीखालील शिलालेखात येतात. या मुर्तीखाली असलेल्या शिलालेखातुन या मुर्ती १०९७ मध्ये स्थापित झाल्याचे दिसुन येते. गोविंद महाप्रभुंनी तेराव्या शतकात या शहराला भेट दिल्याचे उल्लेख येतात. वऱ्हाडच्या इमादशाहीत अचलपूर सुभ्यातील बडनेरा हा एक परगणा व उमरावती हे त्यातील कसबा होते. इ.स. १७२२ मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी राणोजी भोसले यांना बडनेरा परगणा व त्यातील काही गावे लष्करी खर्चासाठी दिल्याने राणोजीने आपले मुख्य ठिकाण अमरावतीला हलवले. राणोजी भोसले यांनी येथे व्यापाऱ्यांना व सावकारांना सोई सुविधा देऊन बाजारपेठ वसवली व उमरावती हे बाजारपेठ म्हणुन उदयास आले. १५ डिसेंबर १८०३ रोजी गाविलगडवर झालेल्या लढाई नंतरच्या तहात संपूर्ण वऱ्हाड ब्रिटीशांच्या ताब्यात आले. ब्रिटिशांनी वऱ्हाड प्रांत हैदराबादच्या निजामास दिला व वऱ्हाडावर निजामाची सत्ता प्रस्थापित झाली. अमरावतीच्या भरभराटीमुळे अमरावती गावावर लुटारूंची अनेक आक्रमणे झाली व पेंढाऱ्याकडून हे गाव अनेकदा लुटले गेले. येथील सावकार व व्यापाऱ्यांनी नागपूर व हैदराबाद येथे अनेकदा तक्रारी करूनही काही फायदा झाला नाही. इ.स.१८०५ मध्ये पेंढार्यांनी अमरावतीवर हल्ला केला असता अमरावतीच्या सावकारांनी चित्तू पिंडारीला सात लाख रुपये देऊन अमरावतीचे रक्षण केले. या लुटी किती भयंकर असत याचे वर्णन ब्रिटीश अधिकारी व लेखक कॅ. मेडोज टेलर याने लिहिलेल्या द कन्फेशन ऑफ ठग या पुस्तकात वाचायला मिळते. यानंतर ब्रिटीश अधिकारी कर्नल क्लोज याने झालेल्या लुटीची माहिती घेऊन, हैदराबादचा रेसिडेंट कर्नल पेट्रिक यास शहराच्या संरक्षणार्थ परकोट बांधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कर्नल पेट्रिक याने निजामाचा दिवाण मीरआलम यास राजी करून इ.स. १८०५ मध्ये शहरास तटबंदी बांधण्याचा आदेश दिला. त्यावेळी येथील सुभेदार महीपतराम याने निझाम सरकारच्या खर्चाने इ.स. १८०६ ला संरक्षणासाठी परकोट बांधण्यास सुरवात केली व १८२१ मध्ये परकोट बांधून पूर्ण झाला. हे बांधकाम पुर्ण करण्यास १६ वर्षे लागली व या बांधकामावर त्याकाळी चार लाख रुपये खर्च झाले. १८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित वऱ्हाड प्रांत काही काळाकरिता गहाण म्हणुन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिला. इ.स.१८५८ मध्ये गाविलगड, नरनाळा व आमनेर हे किल्ले तोडताना ब्रिटीशानी अमरावतीचा परकोट पाडण्याचा प्रयत्न केला पण येथील जनतेच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. इ.स.१९२६ मध्ये भुसारी दरवाजाचे बुरुज अचानक पाडणे सुरु झाले तेव्हादेखील लोकांनी हा प्रयत्न हाणून पडला. इ.स.१९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड प्रांत कायमचा ब्रिटीशांच्या ताब्यात दिला. इ.स. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान संपुर्ण विदर्भ तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. इ.स.१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अमरावती महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावतीकरांचा मानदंड असलेला हा भुईकोट किल्ला त्यावेळी ब्रिटीशांच्या तावडीतून वाचला खरा पण आज मात्र तो स्थानिकांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!