AMRAPUR

TYPE : CITY FORT

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथुन शेवगावकडे जाताना अमरापुर नावाचे गाव आहे. प्रसिद्ध अभिनेता सदाशिव अमरापुरकर याचे गाव या पलीकडे या गावाची फारशी ओळख कोणाला नाही. काही हौशी भटक्यांना हे ठिकाण माहित आहे ते येथील अमृतेश्वर महादेव मंदिरामुळे. मंदिर जरी साधे असले तरी या मंदीराजवळ असलेली बारव मात्र प्राचीन आहे किंबहुना या प्राचीन बारवमुळेच मंदीराची ओळख आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण कधीकाळी हे गाव कोटात वसलेले असुन त्या कोटाला दोन दरवाजे आहेत हे मात्र फारसे कोणाला माहित नाही. चला तर मग अमरापुरची भटकंती करायला. अमरापुर हे गाव पाथर्डी शहरापासुन १३ कि.मी. अंतरावर तर शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी. अंतरावर आहे. गावात गेल्यावर नदीच्या काठावरून एक कच्चा रस्ता गावाच्या स्मशानभूमीकडे जातो. या स्मशानभूमी समोरच नगरकोटचा पहिला दरवाजा आहे. हा दरवाजा व त्याशेजारील तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन दरवाजाची कमान नष्ट झाली आहे. दरवाजा बऱ्यापैकी उंच असुन त्याच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. ... हा दरवाजा पाहुन कच्च्या रस्त्याने अमृतेश्वर शिवमंदीराकडे जावे. मंदिर साधेच असुन मंदिरामागे असलेली प्राचीन बारव मात्र अतिशय सुंदर आहे. ९०x६० फुट आकाराची हि बारव चांगलीच मोठी असुन बारवमध्ये उतरण्यासाठी एका बाजूने तळापर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. बारवेच्या मध्यावर तीन बाजूनी चौथरा बांधलेला असुन त्यावर विश्रांतीसाठी उजवीकडे व डावीकडे ओवऱ्या बांधलेल्या आहेत. यातील डावीकडील ओवरीची पडझड झालेली आहे. चौथर्यावरील या ओवरीत जाण्यासाठी दोन बंदीस्त मार्ग असुन यातील एक वाट पायऱ्याच्या मध्यावरून तर दुसरी वाट डावीकडील माथ्यावरून बारवमध्ये उतरते. स्वच्छता नसल्याने पाणी खराब झाले असले तरी आसपासच्या शेतीसाठी वापरले जाते. बारव पाहुन झाल्यावर गावातील भैरवनाथ मंदीराजवळ यावे. या ठिकाणी कोटाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा देखील घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या दर्शनी भागात उजवीकडे व्याघ्रशिल्प कोरले आहे. दरवाजाच्या आतील भागात डावीकडे दरवाजावर जाण्याचा मार्ग आहे मात्र दरवाजाची कमान व वरील भाग पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस लाकडी दरवाजा अडकविण्यासाठी असलेले दगडी बिजागर आजही शिल्लक आहेत. याशिवाय गावाच्या मध्यवर्ती भागात एका लहानशा उंचवट्यावर शेट्ये यांचा गढीवजा वाडा आहे. या वाडयाच्या चारही बाजुस तटबंदी असुन एका टोकावर गोलाकार बुरुज आहे. वाड्याचा मध्यवर्ती भागात चौक असुन आत वस्ती असल्याने अंतर्गत भागात जाता येत नाही. संपुर्ण अमरापुर गावाची भटकंती करण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!