AMBAWADE-JIVAMAHALA SAMADHI
TYPE : SAMADHI
DISTRICT : PUNE
पुण्याजवळ असलेल्या भोरच्या परीसरात एक दिवसाच्या भटकंतीसाठी आंबवडे नावाचे निसर्गरम्य गाव आहे. या गावाला केवळ निसर्गाचे वरदान लाभलेले नसुन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावात कान्होजी जेधे, जिवा महाला व भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. याशिवाय आंबवडे गावातील ओढ्याच्या काठावर दाट झाडीत नागेश्वराचे पुरातन मंदिर असुन तेथे जाण्यासाठी ओढयावर झुलता पुल बांधला आहे. आंबवडे गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोर या तालुक्याच्या ठिकाणावरून १२ कि.मी.अंतरावर आहे. भोरवरून आंबवडे गावात येण्यासाठी एसटीची चांगली सोय आहे. आंबवडे गावातुन वाहणारा हा ओढा म्हणजे एक लहान नदीच आहे. हि नदी पार करण्यासाठी १९३६ साली या नदीपात्रावर झुलता पुल बांधला गेला. याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे. झुलता पुल पार केल्यावर पलीकडील बाजुस असलेल्या एका इमारतीत भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे.
...
या इमारतीच्या मागील आवारात झाडाखाली काही कोरीव मुर्ती व विरगळ तसेच सतीशिळा पहायला मिळतात. येथील गर्द झाडीतून पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरत गेल्यावर खोलगट भागात नागेश्वर मंदिराचे आवार येते. शिवकाळातील या मंदिराभोवती फरसबंदी अंगण असून एका उंच चौथऱ्यावर पश्चिमाभिमुख मंदीर बांधलेले आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी केलेली असून मंदिराच्या आतबाहेर मोठया प्रमाणात शिल्पकाम केलेले आहे. संपुर्ण मंदिर घडीव दगडात बांधलेले असून शिखर मात्र विटांनी बांधुन त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. मंदिराच्या आवारात दिपमाळ असून काही लहान घुमटी आहेत. या घुमटीत काही प्राचीन मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मोठया प्रमाणात झीज झालेल्या प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिरासमोर ओवऱ्या बांधलेल्या असुन त्याच्या समोर बारमाही वहाणारा झरा आहे. या झऱ्याचे पाणी गोमुखातून एका कुंडात पडते. हे कुंड पंचगंगा कुंड म्हणुन ओळखले जाते. मंदिराचा परीसर अतिशय रमणीय आहे. नागेश्वर मंदिर पाहुन झाल्यावर येथुन साधारण १ कि.मी. अंतरावर असलेल्या कान्होजी जेधे व जिवा महाला यांच्या समाधी स्थानाकडे गाडीने अथवा चालत जाता येते. गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी असलेल्या या ठिकाणाला गावकरी कान्होबाची घुमटी व घुमटी मंदीर म्हणुन ओळखत असल्याने आपण देखील याच नावाने चौकशी करावी. येथे एका सरळ रेषेत तीन घुमटीवजा मंदिरे आहेत. यातील पहिली घुमटी म्हणजे जिवा महाला यांची समाधी असून दुसरी घुमटी कान्होजी जेधे यांची समाधी आहे तर तिसऱ्या घुमटीत भवानी मातेची मुर्ती आहे. जिवा महाला यांची एकुण समाधी पहाता ती फारसी जुनी असल्याचे वाटत नाही. समाधीखालील दगडी चौथरा फारतर जुना असावा पण वरील बांधकाम मात्र अलीकडील काळातील आहे. जीवा महाला यांचे संपुर्ण नाव जीवबा महाला संकपाळ. वाई तालुक्यात महाबळेश्वराच्या पायथ्याशी असलेले कोंडवळी हे त्यांचे गाव. धोम धरणामुळे हे गाव आता स्थलांतरित झाले आहे. इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत. प्रतापगडच्या अफजलखान भेटीवेळी जिवा महाला महाराजांचा अंगरक्षक होता. अफझलखानास मारल्यावर त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याने शिवाजी महाराजांवर तलवारीचा वार केला यावेळी मध्ये पडत जीवा महालाने हा वार परतवला व सय्यद बंडाचा हात छाटला. जिवा महालाच्या या शौयाने होता जिवा म्हणून वाचला शिवा हा वाकृप्रचार रूढ झाला. अफजलखानाचा वध केल्यावर जिवा महाला व संभाजी कावजी त्याचे शीर घेऊन राजगडावर गेले. पुढे हुकुमाची अवज्ञा केल्याबद्दल महाराजांनी जीवा महालास दूर केले. छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. सन १७०९ साली जीवा महाला मरण पावला. सोबत खाजगी वाहन असल्यास आंबवडे भेटीत कान्होजी जेधे यांचा कारी येथे असलेला वाडा देखील पहाता येतो.
© Suresh Nimbalkar