AKKALKOT

TYPE : CITY FORT

DISTRICT : SOLAPUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

अक्कलकोट म्हटले कि आपल्याला आपल्याला आठवतात ते श्री स्वामी समर्थ महाराज !!! स्वामी समर्थ महाराज यांच्यामुळे अक्कलकोट शहर संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थ महाराज यांच्या शिवाय अक्कलकोटची ओळख पुर्ण होऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी यामुळे अक्कलकोटचा मुळ इतिहास धुसर झाला आहे, हे तितकेच सत्य आहे. अक्कलकोट हे अठराव्या शतकात अस्तित्वात आलेले स्वतंत्र संस्थान होते. इ.स.१७०८ मध्ये राणोजी लोखंडे यांना छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. फतेहसिंह भोसले हे या अक्कलकोट संस्थानाचे संस्थापक व पहिले अधिपती होते. इ.स.१८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते पण सातारा संस्थान खालसा झाल्यावर अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. अठराव्या शतकात अक्कलकोट शहर हे तटबंदीच्या आत वसलेले होते. या संपुर्ण शहराला कोट व त्याबाहेर खंदक होता. अक्कलकोट संस्थानाचे संस्थापक फतेहसिंह भोसले यांचा टेकडीवर असलेला जुना राजवाडा म्हणजे एक प्रकारचा भुईकोट किल्ला होता. अक्कलकोट शहराला भेट देण्यासाठी सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे सोलापुर. सोलापुर येथुन अक्कलकोट ४० कि.मी. अंतरावर असुन येथे रेल्वे स्थानकाबाहेर अक्कलकोटला जाण्यासाठी बस,रिक्षा तसेच खाजगी वाहनाची सोय आहे. ... अक्कलकोट शहराभोवती असणारी कोटाची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीतील केवळ एक बुरुज शिल्लक आहे. हा बुरुज स्वामी समर्थ महाराजांच्या मंदीराजवळ असल्याने स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊनच आपली अक्कलकोटची भटकंती सुरु करावी. २००८ सालापर्यंत या ठिकाणी २ बुरुज व त्याबाहेर असणारा खंदक स्पष्टपणे दिसत होता. पण आता २०२२ साली अक्कलकोटची भटकंती केली असता यातील एक बुरुज नष्ट झाला असुन खंदकाचे रुपांतर बंदीस्त नाल्यात व त्यावरील दुकानात झाले आहे. हा बुरुज मुख्य रस्त्यावर मंदीरात जाण्याचा मार्ग व बाहेर येण्याचा मार्ग याच्या मध्यभागी आहे. बुरुज बाहेरून दिसत असला तरी या बुरुजाला चारही बाजुंनी अतिक्रमणाने वेढलेले असल्याने तेथे जाण्याचा मार्ग सहजतेने दिसुन येत नाही. या बुरुजाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे आपण मंदीरात जाताना ज्या दुकानांच्या गल्लीतुन जातो त्या गल्लीतील उजवीकडील शेवटचे दुकान. या दुकाना शेजारी लहानशी बोळ असुन या बोळीचा वापर स्थानिक मुतारीसाठी करतात. आपण त्यातुन वाट काढत या बुरुजापर्यंत जायचे. अष्टकोनी आकाराचा हा बुरुज घडीव दगडात बांधलेला असुन त्याच्या माथ्यावर प्रशस्त दगडी चर्या आहेत. बहुतांशी बुरुज मातीत गाडला गेला असुन सद्यस्थितीत दिसणारी त्याची उंची १५ फुट आहे. कोटाचा हा एकमेव अवशेष शिल्लक असल्याने आपली नगरदुर्गाची फेरी सुरु होते तेथेच संपते. रस्त्याच्या कडेने दुकानांच्या परिसरात फेरी मारली असता खंदकाचे काही अवशेष पहायला मिळतात. यानंतर भटकंती मधील दुसरी वास्तु म्हणजे जुना राजवाडा. हा राजवाडा एका उंच टेकडावर बांधलेला असुन त्याची आतील भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. चौकोनी आकाराचा हा राजवाडा एक एकरपेक्षा जास्त परिसरावर पसरलेला असुन याच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन दरवाजाच्या वरील भागात नगारखाना आहे. कोटाचे चारही बुरुज आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या डावीकडील बुरुजावर एक व्यालसदृश्य शिल्प पहायला मिळते. राजवाड्याची आतील भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने आत प्रवेश दिला जात नाही. मुख्य दरवाजाच्या आतील भागात एक प्रशस्त चौक असुन तेथे सदरेचे कामकाज चालात असे. या ठिकाणी पहारेकऱ्यांची राहण्याची सोय आहे. या चौकातच राजवाड्याच्या आतील भागात जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. येथुन पुढे प्रवेश नाही. वाडयाच्या उत्तरेकडील बाजुस कुंपणाच्या आत दोन चौथऱ्यावर दोन मोठ्या तोफा ठेवलेल्या आहे. यानंतरची तिसरी वास्तु म्हणजे नवीन राजवाडा. या ठिकाणी अक्कलकोट संस्थानाचे खाजगी शस्र संग्रहालय असुन तेथे मोठ्या प्रमाणात जुनी शस्त्रास्त्रे पहायला मिळतात. या राजवाड्याच्या मागील बाजुस म्हणजे दर्शनी भागात आपल्याला अजुन दोन मध्यम आकाराच्या तोफा पहायला मिळतात. अक्कलकोट शहराची भटकंती करताना अनेक जुनी घरे तसेच वाडे दिसुन येतात. सकाळी लवकर सुरवात केल्यास अक्कलकोट शहर फिरण्यासाठी अर्धा दिवस पुरेसा होतो व दुसऱ्या सत्रात सोलापुरचा किल्ला पहाता येतो. अक्कलकोट शहराची दुर्गभ्रमंती करताना स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाला भेट देऊन त्याच्या दर्शनाचे पुण्यदेखील पदरात पाडुन घेता येते. इ.स. १६८९ मध्ये रायगडचा पाडाव झाल्यावर महाराणी येसूबाई व पुत्र बालशिवाजी (शाहू) मुघलांचे कैदी बनले. इ.स.१७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर बादशहा बनलेला आजम याने दिल्लीच्या वाटेवर असता भोपाळ जवळ दारोहा येथे शाहूमहाराजांची सुटका केली. शाहू महाराज तेथुन दक्षिणेत येत असता त्यांच्या सैन्याची पारद येथे शहाजी लोखंडे-पाटील यांच्याशी छोटी लढाई होऊन त्यात गावचे पाटील मारले गेले. त्या वेळी त्यांच्या विधवा पत्नीने आपला मुलगा राणोजी लोखंडे यांस शाहू महाराजांच्या पायावर घालून अभय मागितले. शाहूमहाराजांनी या मुलाचा दत्तक म्हणुन स्वीकार करत पारद येथे झालेल्या विजयाप्रीत्यर्थ या मुलाचे नाव फत्तेसिंह ठेवून त्याला बरोबर घेतले. हा मुलगा म्हणजेच अक्कलकोट संस्थानचे संस्थापक फत्तेसिंहराजे भोसले होय. फत्तेसिंह भोसले यांना शाहूमहाराज राजपुत्राप्रमाणे मानीत असत. त्यामुळे कर्नाटकाचा सुभा त्यांनी फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिला. १७२५मध्ये शाहू छत्रपतींनी निजामाला रोखण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांना कर्नाटकात मोहिमेवर पाठवले. मोहिमेवर जाताना प्रतिनिधी व प्रधान यांनी त्यांच्यासोबत रहावे असा नियम शाहू महाराजांनी केला होता. यावरून शाहू महाराजांनी त्यांना राजपुत्राला शोभेल अशी व्यवस्था केल्याचे दिसून येते. फत्तेसिंह भोसले यांनी चित्रदुर्गपासून-सौंदे बिदनूर पर्यंतच्या सर्व खंडण्या वसूल केल्या. मराठ्यांच्या सर्व ठाणी सोडवून परत आपल्या ताब्यात घेतली. इ.स. १७२५-२६ या काळात वयाच्या केवळ अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली हि मोहीम पार पडली. मार्च १७२६मध्ये कर्नाटकची मोहीम पार पाडून फत्तेसिंह भोसले सातारा येथे आले असता शाहू छत्रपतींनी त्यांचा सन्मान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त रायगड हे मुघलांच्या ताब्यात होते. ते परत मराठी राज्यात आणण्याची कामगिरी शाहूमहाराजांनी फत्तेसिंह भोसले यांना सांगितली. ही मोहीम १७३१ते १७३४ पर्यंत चालली आणि रायगड मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर फत्तेसिंह भोसले कायमस्वरूपी अक्कलकोट येथे राहु लागले. पेशव्यांच्या राज्य कारभारापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. फत्तेसिंह भोसले यांचा २० नोव्हेंबर १७६० रोजी अक्कलकोट येथे मृत्यू झाला. फत्तेसिंह भोसले यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मुलांमध्ये कलह निर्माण होऊन त्यांच्या अक्कलकोट, पिलीव आणि राजाचे कुर्ले अशा तीन शाखा अस्तित्वात आल्या. राजाचे कुर्ले व पिलीव या दोन्ही ठिकाणी राजे-भोसले यांचे गढीवजा किल्ले आहेत. अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले १९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले. इ.स.१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अक्कलकोट संस्थान भारतात विलीन झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!