AHU KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : VALSAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. संजाणजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला अहु कोट हा असाच एक लहानसा कोट. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा भाग भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांचे येथुन उच्चाटन झाल्यावर हा प्रांत स्वराज्यात आल्याने मी या कोटांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. दमणच्या सरहद्दीवर असलेल्या कोटांची भटकंती करताना आम्हाला या कोटाची माहिती मिळाली. अहु कोट पहाण्यासाठी संजाण हे जवळचे रेल्वे स्थानक असुन संजाण- अहु कोट हे अंतर ७ कि.मी.आहे. अहू येथे जाण्यासाठी संजाण रेल्वे स्थानकातून खाजगी रिक्षांची सोय आहे. संजाण येथुन नारगोलकडे जाणाऱ्या रस्त्याने कतलवाडा पार केल्यावर साधारण ३ कि.मी.अंतरावर रस्त्याच्या उजव्या बाजुस अहु प्रायमरी शाळा आही तर डाव्या बाजुस तारांचे कुंपण दिसते. ... या कुंपणाला असलेल्या फाटकातून आहु कोटाला जाता येते. हि जागा खाजगी असली तरी येथील सुरक्षा रक्षक कोट पहायला परवानगी देतात. या फाटकातून कच्च्या रस्त्याने चालत ५ मिनीटे सरळ गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेली आहु कोटाची वास्तु पहायला मिळते. हि वास्तु म्हणजे मरोली कोटाची प्रतिमा आहे. ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहींत. या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच विटांचा वापर केलेला आहे. इमारतीच्या आतील व बाहेरील भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. दरवाजाची कमान व एका बाजूची भिंत पुर्णपणे ढासळलेली असुन वरील भागात एक खिडकी दिसुन येते. इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने येथे कोट असावा असे ठाम विधान करता येत नाही. वास्तुच्या आतील भागात असलेला चुन्याचा गिलावा पहाता हि वास्तु म्हणजे जकातनाका किंवा प्रशासकीय ठिकाण असावे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. स्थानिकांना या वास्तुची कोणतीही माहिती नसुन या वास्तुला ते मेडी म्हणुन ओळखतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!