ADSUL
TYPE : HILL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 1375 FEET
GRADE : VERY HARD
मुंबईहुन अहमदाबादकडे जाताना पालघर तालुक्यात या महामार्गाच्या डावीकडे अशेरी किल्ला असुन उजव्या बाजुस अडसुळ नावाचा सुळका उभा आहे. अनेकजण या सुळक्याचा किल्ला अडसुळ किल्ला किंवा अडकिल्ला म्हणुन करतात. पण यावर गडाचे कोणतेही अवशेष नसुन वर असलेले एकमेव टाके पहाता हे फारतर टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. मुंबईहुन ट्रेनने अथवा स्वतःच्या वाहनाने अडसुळची भटकंती एका दिवसात करता येते. अडसुळ सुळक्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे बोईसर स्थानक जवळचे ठिकाण असले तरी तेथुन महामार्गावर येण्यासाठी वहानांची विशेष सोय नसल्याने डहाणु स्थानक सोयीचे ठरते. खोडकोना हे अशेरीगडाच्या पायथ्याशी असलेले गाव बोईसर रेल्वे स्थानकापासून चिल्हार फाट्यामार्गे २४ कि.मी.वर तर डहाणु रेल्वे स्थानकापासून चारोटी मार्गे ३६ कि.मी. अंतरावर आहे. चिल्हार फाटा ते खोडकोना गाव हे अंतर ७ कि.मी.आहे. खोडकोना गाव महामार्गापासुन आतील बाजुस असुन मुंबईहुन अहमदाबादकडे जाताना चिल्हारपासुन ५ कि.मी अंतरावर महामार्गाच्या डावीकडे खोडकोना गावात जाणाऱ्या फाट्यावर वनखात्याने अशेरीगडचा फलक लावलेला आहे. येथुन महामार्गाच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या अडसुळ सुळक्याकडे पाहीले या सुळक्याची एक सोंड पुढे काही अंतरावर महामार्गाच्या दिशेने उतरलेली दिसते.
...
या सोंडेवरूनच सुळक्यावर जाण्याचा मार्ग आहे. अडसुळवर फारसे कोणी जात नसल्याने वाटा रुळलेल्या नाहीत त्यामुळे वर जाण्यासाठी शक्यतो वाटाडया सोबत घ्यावा. स्वतःचे वाहन नसल्यास या फाट्यापासुन १ कि.मी.आत खोडकोना गावापर्यंत चालत जावे लागते. खोडकोना गावात अडसुळवर जाण्यासाठी वाटाडे मिळतात. अडसुळ सुळका हा कठीण श्रेणीतील सुळका असुन त्याच्या शेवटच्या टप्प्यात २०१५ साली एका दुर्ग संस्थेने २० फुट उंच शिडी बसवली होती. पण करोना काळात येथील वावर पुर्णपणे थांबल्याने हि शिडी चोरीस गेली आहे. मुळात हा किल्ला कठीण श्रेणीतील असुन आता शिडी नसल्याने अत्यंत कठीण श्रेणीतील बनला आहे, त्यामुळे गिर्यारोहण तंत्र व साधने याचा वापर करणे गरजेचे आहे. वाटेत पिण्यायोग्य पाणी नसल्याने आधीच अथवा खोडकोना गावातुन पुरेसे पाणी घेऊन गड चढण्यास सुरवात करावी. सुळक्यावर जाऊन पुन्हा पायथ्याशी येण्यासाठी चार तास पुरेसे होतात. सुळक्यावर जाणाऱ्या वाटेवर मोठया प्रमाणात जंगल असले तरी येथील दमट वातावरणाने गड चढताना चांगलीच दमछाक होते. या वाटेने महामार्गापासुन साधारण तासाभरात आपण सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. येथुन खऱ्या अर्थाने वाटेवरील कसरत सुरु होते. वाटेच्या सुरवातीस ६ फुट उंचीचे प्रस्तरारोहण करावे लागते. येथुन पुढील वाट हि पुर्णपणे घसाऱ्याची असुन नराचा वानर होऊनच हे अंतर पार करावे लागते. या वाटेवर एकुण तीन ठिकाणी कातळटप्पे असुन यातील दोन ठिकाणी कातळात खाचा कोरलेल्या आहेत तर एका ठिकाणी कातळावर पकड घेऊनच वर चढावे लागते. हे चारही टप्पे पार केल्यावर पुढे साधारण कातळटप्पे पार करत आपण सर्वोच्च सुळक्याच्या माथ्याखाली येतो. या वाटेवर एका ठिकाणी कातळात सुरुंगासाठी अथवा कठड्यासाठी कोरलेले दोन गोलाकार खळगे पहायला मिळतात. हा कातळटप्पा साधारण २० फुटाचा असुन या ठिकाणी पूर्वी शिडी बसवली होती, त्यामुळे काही प्रमाणात हिंमत करून वर चढता येत होते पण आता गिर्यारोहण साधनाशिवाय पर्याय नाही. एक टप्पा आउट झाल्यास सरळ ४०० फुट खाली. हा टप्पा चढुन वर आल्यावर पुन्हा एक लहानसा घसारा पार करून आपण सुळक्याच्या माथ्यावर पोहोचतो. सुळक्याचा माथा अतिशय निमुळता असुन वर पाण्याऐवजी सध्या मातीने भरलेले टाके वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. येथे एका कातळावर जवळजवळ दोन खळगे कोरलेले असुन काही अंतरावर तिसरा खळगा आहे. मातीने भरलेले पाण्याचे टाके पाहुन पायवाटेवर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. येथुन विवळवेढे, सेगवाह, गंभीरगड, कोहोज, टकमक, काळदुर्ग, अशेरीगड हे किल्ले तसेच सूर्या,पिंजाळ व वैतरणा नदीचे पात्र इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. सुळक्याखालुन नागमोडी वळणे घेत जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग एखाद्या नदीप्रमाणे भासतो. सुळका फिरण्यास १० मिनीटे पुरेशी होतात. बखरीतील नोंदीप्रमाणे प्रतापबिंब राजाच्या ताब्यात असलेला हा प्रदेश १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. इ.स.१५५६ मधे पोर्तुगीजांनी वसई ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीज व गुजरात सुलतान यांच्यात झालेल्या तहानुसार अशेरीगड सहा परगणे व त्यातील अडतीस गावे यावर पोर्तुगीजांचा ताबा आला. या किल्ल्याच्या परिसरात जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या सागाच्या झाडांचे जंगल मोठया प्रमाणात असल्याने पोर्तुगीज काळात अशेरी किल्ल्याचे महत्व वाढीस लागले. इ.स.१५५६ ते इ.स.१६८३ अशी तब्बल १३० वर्षे हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. याच काळात अशेरीगडाच्या रक्षणासाठी त्याच्या समोर असलेल्या अडसुळ डोंगरावर टेहळणी ठाणे निर्माण करण्यात आले असावे. शिवकाळात इ.स.१६५७ मधे मराठयांच्या कल्याण भिवंडी स्वारीनंतर १६५८ मध्ये पोर्तुगीज व्हाईसराय आपल्या राजाला पाठविलेल्या पत्रात शिवाजीने आमच्या उत्तर विभागातल्या मुलुखाला उपद्रव दिल्याचे कळवतो. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इ.स.१६८३ साली मराठयांनी अशेरीगडासह हा प्रदेश जिंकला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये पोर्तुगीजांनी हा भाग पुन्हा ताब्यात घेतला. पुढे चिमाजीअप्पाच्या वसई मोहिमेत मराठ्यानी अशेरीगडाला वेढा घालून पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३८ रोजी गड जिंकून घेतला व हा प्रदेश मराठी राज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar