AADAS
TYPE : FORTRESS
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना केज तालुक्यातील आडस येथे अशीच एक जुनी गढी पहायला मिळते. अंबेजोगाई- आडस हे अंतर २० कि.मी.असुन धारूर किल्ल्यापासुन हि गढी १४ कि.मी.अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. गावात असलेले असंख्य आड (विहिरी) व आडकेश्वराचे मंदिर यामुळे गावाला आडस नाव पडल्याचे गावकरी सांगतात. गढीजवळ आल्यावर दरवाजाच्या समोरील बाजुस कधीकाळी परकोट असल्याच्या खुणा दिसुन येतात. आज हा परकोट पुर्णपणे नष्ट झाला असुन या परकोटात चार दरवाजे असल्याचे स्थानिक सांगतात.
...
या परकोटाच्या आज केवळ खुणा शिल्लक आहेत. गढीचे तळातील बांधकाम दगडात केलेले असुन वरील बांधकामासाठी पांढरी चिकणमाती वापरलेली आहे. तटाची उंची साधारण ३० फुट असुन फांजीचा भाग मोठ्या प्रमाणात ढासळलेला आहे. मुख्य गढी चौबुर्जी असुन तटबंदीच्या मध्यभागी उत्तराभिमुख दरवाजा आहे. मुख्य दरवाजासमोर मारुतीची लहानशी घुमटी असुन दरवाजात जाण्यासाठी घडीव दगडांच्या पायऱ्या आहेत. गढीच्या दरवाजाबाहेर डाव्या बाजुस कमानीवजा देवडी असुन त्यावर गढीच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मुख्य गढी परकोटात असल्याने या पायऱ्या बाहेर बांधण्यात आल्या असाव्यात. या ठिकाणी पुर्वी गढीची कचेरी होती. गढीचा लाकडी दरवाजा आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. दरवाजाच्या आतील भागात विटांचा वापर केलेला आहे. गढीत नव्याने बांधलेल्या घरांनी त्यातील मुळ अवशेष पुर्णपणे झाकलेले असुन हि घरे देखील आता निर्जन झाल्याने मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. अलीकडील काही वर्षापर्यंत येथे आडसकर यांचे वंशज राहत होते पण गढीची पडझड व्हायला लागल्याने ते बाहेर राहायला गेले. दरवाजाच्या उजव्या बाजुस काही अंतरावर घडीव दगडात बांधलेली गोलाकार आकाराची ५० फुट खोल विहीर आहे. गढीचा परीसर साधारण १५ गुंठे असावा. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढी पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गावात हि गढी बाबुराव आडसकर देशमुखांची गढी म्हणुन ओळखली जाते. यांचे मूळ आडनाव कोकाटे असुन अक्कलकोटचे हे घराणे आडस गावचे देशमुखी वतन मिळाल्यावर या गावात स्थायिक झाले. खर्डा येथील लढाईत सरदार आडसकर यांचा सहभाग असल्याचे गावकरी सांगतात पण कोणाच्या वतीने यावर प्रकाश टाकत नाहीत. गढीवर दसरा सण आजही साजरा केला जातो. आडसकर देशमुखांचे वंशज कै बाबुराव आडसकर हे आमदार होते.
© Suresh Nimbalkar